वर्धा - भाऊ आणि वडील यांच्यामुळेच या पदावर पोहोचलो. पण, या प्रवासात वडिलांनी जगणं शिकवले, तर भावाने यशाचा मार्ग दाखवला. आईची इच्छा म्हणून डॉक्टर झालो. या सगळ्या प्रवासाचे श्रेय शाळेतील गुरूंना आहेच. पण, वडील आणि भाऊ यांचे स्थान गुरू म्हणून श्रेष्ठ असल्याची भावना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी बोलून दाखवली.
वडील पहिले गुरू -
बनप्पा तेली, असे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. त्यांचे शिक्षण फक्त चौथ्या वर्गापर्यंत झाले होते. मात्र, त्यांनी अतिशय संघर्षमय आयुष्य जगले. ते कर्नाटकमधील बेळगावीमधील रायबाग तालुक्यातील हंदीगुंद या गावातील रहिवासी आहेत. बसवराज यांना तीन भाऊ आणि एक बहीण आहे. एक एकर जमीन असतानाही रात्रंदिवस मेहनत घेतली. मेहनतीच्या जोरावर एक एकराची ३० एकर शेती झाली. हे काम सोपे नव्हते. मात्र, वडिलांनी मेहनतीच्या भरवश्यावर ते केले. वडिलांनी मुलांचे शिक्षणच नाहीतर, त्यांना सनदी सेवेत उच्चपदावर पोहोचवण्यासाठी कष्ट घेतले. त्यामुळे त्यांच्याकडून संघर्षमय जीवन कसे जगायचे? असा धडा मिळाला, असे बसवराज तेली सांगतात.
शिक्षणावर होणारा खर्च जास्त होत आहे, असा शब्दही त्यांच्या तोंडातून निघाला नाही. एकदा बसवराज यांना जास्त शुल्क भरावे लागणार होते. त्यावेळी त्यांनी वडिलांना सांगितले. त्यावर शिक्षणासाठी पैसे देणं माझं काम आहे. अभ्यास करणे तुमचे काम आहे. आज कष्ट कराल, तर भविष्य उज्ज्वल असेल, असे वडील म्हणाले. वडिलांच्या या शब्दांनी शिकून मोठे व्हायची जिद्द पुन्हा प्रबळ झाल्याचे बसवराज सांगातात.
...म्हणून बसवराज आधी डॉक्टर झाले -
बसवराज यांचे गाव वैद्यकीय सुविधा असलेल्या शहरापासून ८० किलोमीटर लांब होते. त्यामुळे आपला मुलगा डॉक्टर व्हावा, अशी एकही वर्ग न शिकलेल्या बाळाबाई तेली म्हणजे बसवराज यांच्या आईची इच्छा होती. काही कारणास्त बसवराज यांचे मोठे भाऊ सिद्धलिंगप्पा हे डॉक्टर होऊ शकले नाही. त्यामुळे आईने त्यांची इच्छा बसवराज यांच्याकडून पूर्ण करवून घेतली. आईच्या इच्छेमुळे डॉ. बसवराज हे पोलीस अधीक्षक होण्यापूर्वी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून गावातील पहिले एमबीबीएस डॉक्टर झाले.
भावामुळे अधिकारी होण्याचा मार्ग दिसला -
बसवराज यांच्या मोठ्या भावाचे नाव सिद्धलिंगप्पा होते. त्यांनी यशाचे शिखर गाठण्याचा मंत्र दिला. डॉक्टर होण्यासाठी त्यांनी तयारी केली. मात्र, प्रवेश परीक्षा पास होऊ शकले नाही. त्यानंतर इंजिनिअर होऊन सनदी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. कोणीही मार्गदर्शक नसताना स्वतःच्या जोरावर अभ्यास केला. कष्ट घेतले. सहावेळा त्यांना अपयश आले. मात्र, अखेर २००६ मध्ये भारतीय राजस्व सेवेत त्यांची निवड झाली. त्यांच्याकडे पाहून आपणही या परीक्षा द्याव्यात, असा विचार डोक्यात आला. मोठा भाऊ डॉक्टर होऊ शकला नाही. पण यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. मग मी डॉक्टर झाल्यावर यूपीएससी नक्कीच उत्तीर्ण होणार हा विश्वास जागा झाला. मोठ्या भावाचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे बसवराज यांनी अवघ्या दोन वर्षात यश संपादन केले.
आयुष्यात प्रत्येक नवीन व्यक्तीकडून काहीतरी शिकत गेलो. शालेय जीवनातील गुरुंनीही माझ्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. त्या सर्व गुरुजनांचा मी आभारी आहे. यात माझ्या आयुष्याला आकार देणारे वडील आणि मोठे भाऊ हे माझ्या आद्य गुरुस्थानी आहेत. या माझ्या गुरुंना नमन करत सर्वांना गुरू पोर्णिमेच्या शुभेच्छा देत असल्याचे वर्ध्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली सांगतात.