वर्धा - पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखा पथक तसेच समुद्रपूर पोलिसांनी दारू कायद्याअंतर्गत कारवाई करत दारूसाठा पकडला. यात दारू आणि कार-दुचाकीसह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात चार जणांना दारूबंदी कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
वर्ध्याच्या पुलफैल भागात जहीर खान शाहबाज खान (37) याच्या घरात विदेशी दारू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्याचा घराची झडती घेतली असता त्याच्या बेडरूममध्ये दारूच्या 960 छोट्या बॉटल तसेच ऑफिसर चॉईस कंपनीची विदेशी दारू आढळून आली. यावेळी ज्या गाडीने दारूची वाहतूक केली जात होती ती कार आणि दारुसह एकूण साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय महेंद्र इंगळे, यांचे प्रत्यक्ष हजेरीत पथक प्रमुख निरंजन वरभे, रितेश शर्मा, राकेश आष्टनकर, विकास अवचट, संघसेन कांबळे यांनी केली.
तसेच समुद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत जाम परिसरातही दारूबंदी मोहीम राबविण्यात आली. यात पोलीसांनी तिघांना अटक केले असून दुचाकी आणि दारूसाठाही जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीत पवन जुमनानी (24) रा. नागपूर याच्याकडून दुचाकी आणि कॉलेज बॅगमध्ये असलेली विदेशी दारूच्या बॉटलसह 1 लाख 14 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच शीरशा काळे (65) शिवणी पारधी बेडा व हनिफ शरीफ पठाण (26) रा. जाम या दोघांकडून दारू ताब्यात घेत अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण 1 लाख 22 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार हेमंत चांदेवार, पीएसआय मिलिंद पराडकर, डीबी पथकाचे अरविंद येनूरकर, वैभव चरडे, रवी पुरोहित, आशिष गेडाम यांनी केली.