वर्धा - राज्यात सध्या कोरोना विषाणूने आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. मात्र, वर्धा जिल्हा अद्यापही ग्रीनझोन मध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही उद्योगांना शिथिलता देण्यात आली आहे. पण शहरात कुठल्याही प्रकारची ही शिथिलता देण्यात आली नसल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, अत्यावश्यक वस्तू खरेदीला दिलेल्या सवलतीचा फायदा घेत कारण नसताना काही नागरिक बाहेर फिरत आहेत, अशा नागरिकांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
राज्यातील काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. मात्र वर्धा शहरात सध्या शेती संबंधीचे कामे, कृषी उत्पादन संबंधित दुकाने आणि काही उद्योगांनाच शिथिलता देण्यात आली आहे. इतर गोष्टींसाठी लॉकडाऊनच्या नियम अटीनुसारच कामकाज सुरू आहे. तसेच यापुढेही त्याच पद्धतीने कामकाज चालणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी दिली जाणारी सवलत पाहता मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले आहेत. यासाठी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, पोलीस उपविभागीय अधिकारी पियुष जगताप, तहसीलदार प्रीती डुडुलकर यासह महसूल पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अनेक जण हे विनाकारण फिरत असल्याचे खासकरुन दुचाकी धारक, दुकाने बंद असलेले कारण सांगत फिरणाऱ्यावर दुचाकी थांबत दंड देण्यात आले. यामध्ये विनाकारण दुचाकीवर प्रवास आणि मास्क न घालणाऱ्यांवर २०० रुपये अशी दंडात्क कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस, महसूलची कारवाई, नागरिकांना दिला घरात राहण्याचा सल्ला
जिल्ह्यात असणारे लॉकडाऊन हे 3 मे पर्यंत असणार आहे. यामुळे अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या नावाने प्रचंड गर्दी रस्त्यावर उसळलेली आहे. विचारपूस केली असता अनावश्यक कामे असल्याचे पुढे आल्याने कारवाई करण्यात आली. ज्या दुकानदरांनी नियमांचे उल्लंघन करून दुकान सुरू ठेवले आहे, अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी दिली.
अत्यावश्यक वस्तूचे भाव वाढ केल्यास कारवाई होणार
अत्यावश्यक वस्तूमध्ये किराणा दुकानासह अन्य काही वस्तूंचे भाव वाढ केली आहे. यामुळे अशा पद्धतीने कोणी अधिक पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल त्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये निरीक्षण अधिकारी 9890762756 यावर व्हिडिओ किंवा तक्रार पुराव्यासह दिल्यास कारवाई होईल, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.
यासह जिल्ह्यात बाहेरून येणारा भाजीपाला आणि फळ वाहतूक करून आणण्यास 14 एप्रिलपासून नव्याने परवानगी दिली होती. पण आता नव्याने यामध्ये निर्बंध घालण्यात आले आहे. यामुळे नवीन आदेशपर्यंत बाहेर जिल्ह्यातून भाजीपाला वाहतूक न करता केवळ जिल्हाअंतर्गतचा भाजीपालाच बाजारात विकला जाणार असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण नसणारा जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्यायाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.