वर्धा - देशभरात लोकसभा निवडणुकींचे वारे वाहत असतानाच वर्ध्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी होत आहेत. यातील ४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तसेच उर्वरित २९४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होईल.
एकाच वेळी इतक्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणारा वर्धा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. या निवडणुकीत ४ लाख ८१ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २९४ सरपंच आणि ४३७० सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून, मोठा फौजफाटा सज्ज करण्यात आला आहे.
नागरिकांचे सकारात्मक पाऊल - बिनविरोध निवडणुका
अलिकडे निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. यासाठी गावात प्रचंड चुरशीच्या लढती होतात. या वातावरणात वर्ध्यातील उमरी मेघे, देवळीतील बाभूळगाव बोबडे, कारंजा तालुक्यातील धावसा (बु) आणि किन्हाला या ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणुका करुन वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
रविवारी १०३३ मतदान केंद्रांवर ४१३२ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कार्यरत असणार आहे. यासाठी जिल्ह्यातील तहसील कार्यालयातून त्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात आले आहे. यामध्ये ११५१ कंट्रोल युनिट, तर २३०० बॅलेट युनिट असणार आहे. मतदान केंद्रापर्यंत कर्मचाऱ्यांना पोहोचविण्यासाठी ४२८ परिवहन मंडळ आणि खासगी वाहनांचा वापर करण्यात आला आहे.
यासाठी यंदा सरपंच पदासाठी थेट मतदान होणार आहे.
जिल्ह्यात २९४ सरपंच पदासाठी २३२९ उमेदवार तर १५११ ग्रामपंचायत सदस्यासाठी ४३७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. तसेच ४ लाख ८१ हजार ८१५ उमेदवार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणूक घेणारा वर्धा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यावेळी पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्डचे सुद्धा पाचारण करण्यात आले आहे.
निवडणुकीवेळी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून १०३३ पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ४ उपअधीक्षक, असे ६५ अधिकारी या निवडणुकीवर नजर ठेवून असणार आहे. १०३३ कर्मचाऱ्यांसह ४५० होमगार्ड मदतीला असणार आहे.