वर्धा - जिल्ह्यातील निमगव्हाण येथे आई आणि मुलाच्या दुहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना घडली. गुरुवारी रात्री उशीरा ही घटना उघडकीस आली. जनाबाई नीलकंठ राऊत (वय- ६५), सुरेंद्र निळकंठ राऊत (वय -30) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी पुलंगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरु आहे.
आई आणि मुलगा हे दोघेही नियमित शेतातील कामानिमित्त जात होते. गुरुवारी दुपारी ते शेतात गेले पण घरी परतले नाहीत. मृत महिलेचा मोठा मुलगा हा शिक्षक असून तो पुलगावला राहतो. त्याला एकाने तुझी आई आणि भाऊ शेतात पडून असल्याचे सांगितले. तो पुलगाव पोलिसांच्या मदतीने शेताकडे गेला असता, त्याला आई आणि भावाची हत्या झाल्याचे आढळले. मृतदेहाची आणि घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह पुलगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. या घटनेत शवविच्छेदनाचा अहवाल सुद्धा महत्वाचा असणार आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, दुचाकी आणि त्याच्या बाजूला आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला अपघात झाल्याचा बनाव केल्याची चर्चा होती. पण शरीर आणि डोक्यावरील जखमा पाहता पोलिसांनी अज्ञाताविरोधातहत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव यांच्यासह पुलंगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र गायकवाड यांनी पाहणी केली. हत्याच्या अनुषंगाने जुने काही वाद होते का याची चौकशी सूरु करण्यात आली आहे. लवकरच घटनेचा खुलासा केला जाईल असेही सांगितले जात आहे.