वर्धा - वर्ध्याच्या जळतीकांड प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. यातील आरोपीने प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जीवंत जाळले होते. या प्रकरणी आज दोषारोपपत्र सादर करण्यात येणार होते. मात्र आरोपी विकेश नगराळेचे वकील हजर नसल्याने 17 तारखेपर्यंत कामकाज पुढे ढकलण्यात आले आहे. अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.
वर्ध्याच्या हिंगणघाट येथे 3 फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. या क्रूर कृत्याच्या विरोधात मोर्चा काढत, दारोडा येथील पीडित प्राध्यापिका युवतील न्याय देण्याची मागणी करण्यात आली. तसेच आरोपीला फाशी देण्याची मागणी देखील सर्व स्तरातून होत होती. याप्रकरणी सोमवारी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येणार होते. मात्र आरोपीचे वकील हजर नसल्याने, केवळ दोषारोप पत्राचे प्रारूप आज न्यायालयात सादर करण्यात आले. आता 17 डिसेंबरला पुढील कामकाजाला सुरुवात होणार आहे.
आज न्यायालयात आरोपीला हजर केले असता, न्यायालयाने वकीला संदर्भात आरोपीकडे विचारपूस केली. तेव्हा वकीलाशी माझे बोलने झाले नसल्याने, माझे वकील न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, अशी माहिती नगराळे याने न्यायालयात दिली. त्यामुळे आता येत्या 17 डिसेंबरला दोन्ही पक्षाच्या वकीलांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
17 डिसेंबरला होणार दोषारोपावर कामकाज
17 डिसेंबरला आरोपीचे वकील न्यायालयात हजर राहिल्यास पुढील कामकाजाला सुरुवात होईल, जिल्हा सत्र न्यायाधीश त्यानंतर दोषारोप ठेवून गुन्हा आरोपीला कबूल आहे की नाही हे आरोपीला विचारतील. त्याचे उत्तर नोंद करून पुढील कामकाजाला सुरुवात होईल.
साधारण 20 मिनिट चालले कामकाज
12 वाजण्याच्या सुमारास आरोपी विकेश नगराळेला हिंगणघाट न्यायालयात कडक पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. यावेळी साधारण 20 मिनिटे कामकाज चालले. मात्र पुढील तारखेला सरकारी वकील उज्वल निकम हे न्यायालयात हजर राहू शकणार नसल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शक्ती कायदा हा क्रांतीकारक निर्णय - निकम
शक्ती कायदा विधिमंडळात ठेवला जाईल. मंजुरी नतंर तो केंद्रसरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. हा निर्णय क्रांतीकारक ठरणार असल्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले. या कायद्याने महिला अत्याचाऱ्यांच्या गुन्ह्याला जरब बसेल, बलात्कार, विनयभंग, अत्याचार यासारख्या घटना थांबवता येतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.