वर्धा - येथे विविध विभागामार्फत मागितलेली माहिती देण्यास माहिती अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचे उघडकीस आले. मात्र, अखेर राज्य माहिती आयुक्तांनी एकाच दिवशी ६ प्रकरणात माहिती देण्यासाठी फटकरल्याचे पुढे आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता ताराचंद चौबे यांनी आरोप करत ही माहिती दिली.
प्रशासकीय कामावर वचक राहावा तसेच कामात पारदर्शकता असावी म्हणून माहिती अधिकाराचा नियम लावण्यात आला. पण अनेकदा माहिती देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे पुढे आले. वर्ध्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते ताराचंद चौबे यांनी विविध विभागाकडून माहिती मागितली. मात्र, माहिती देण्याऐवजी विविध कारणे देण्यात आले. ३ मुद्यांची माहिती देताना अर्थबोध होत नसल्याचे म्हणत प्रत्येक माहितीला स्वतंत्र अर्ज करण्याचा सल्ला जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून देण्यात आला.
माहिती अधिकाऱ्यांनी अपील केल्यानंतरसुद्धा माहिती न मिळाल्याने राज्य माहिती आयुक्तांकडे सुनावणी ठेवण्यात आली. यामध्ये त्यांनी मागितलेल्या ६ प्रकरणाची एकाच दिवशी सुनावणी झाली. यात ६ प्रकरणात माहिती देण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना फटकरल्याचे सुद्धा ताराचंद चौबे यांनी सांगितले. यात माहिती न दिल्यास सक्तीची कारवाई केली जाईल, अशी तंबीसुद्धा देण्यात आली.
६ प्रकरण असणारे विभाग
जिल्हाधिकारी कार्यालयातून समृद्धी मार्गावरील वृक्षाची माहिती न देता आर्वी उपविभागाकडे अर्ज पाठवण्यात आला. जिल्हा परिषद बांधकाम विभागाला ११ ग्रामपंचायतच्या दस्ताऐवजची माहिती मागण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी, वर्धा, हिंगणी वन विभागाकडूनसुद्धा माहिती देण्यात आली नाही. या ६ प्रकरणात माहिती देण्याचे आदेश देण्यात आले. यातील एका प्रकरणात गैरहजर राहिल्याने पुन्हा सुनावणीचे आदेश देण्यात आले.