वर्धा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही भाजपा कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेश बकाने यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवारी केले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. यामुळे आमदार पंकज भोयर, राजेश बकाने यांच्यासह आणखी काही जणांवर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या सचिवपदी माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने याची निवड झाली. यानंतर बकाने यांच्यासाठी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तहसीलदारांना या कार्यक्रमाची माहिती मिळाली होती. यानंतर रामनगर पोलिसांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. यात भाजपाचे आमदार पंकज भोयर, सत्कार मूर्ती राजेश बकाने यांच्या अन्य 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - धक्कादायक ! कोरोनाच्या भीतीने मासळी विक्रेत्याची स्मशानभूमीत गळफास घेवून आत्महत्या
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये नगर पालिकेचे बांधकाम सभापती प्रदीप ठाकरे, श्रेया देशमुख, वंदना भुते, सुरेश आहुजा यांच्यासह अन्य काही लोकांचा नावाचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे. दरम्यान, राजकारणी लोकच नियमांचे उल्लंघन करत असतील तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.