वर्धा - आर्वी तालुक्यातील बारा (सोनेगाव) लगतच्या कुर्हा येथील तलावाच्या पाळ म्हणजेच भिंतीला भेगा पडलेल्या दिसताच, गावकऱ्यांनी भीतीने गाव सोडले आहे. या घटनेची माहिती मिळताच, पाटबंधारे विभागाच्या वतीने बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे या भेगा पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, अतिवृष्टी झाल्यास होणारा धोका लक्षात घेत, तहसील प्रशासनाच्या वतीने दीडशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
बार्हा गावाजवळ पाटबांधारे विभागाचा चाळीस वर्षांपूर्वीचा पुरातन तलाव आहे. सततच्या पावसामुळे या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. याच तलावाच्या पायथ्याशी हे गाव आहे. पावसानंतर तलावातील पाणी पाहण्यासाठी काही युवक तलावाकडे आले होते. यावेळी त्यांना या भेगा दिसल्या. त्यानंतर त्यांनी याची माहिती गावकऱ्यांना दिली.
हेही वाचा : वर्धा जिल्ह्यात दिवसभर पाऊस; शेतात पाणी शिरल्याने नुकसान
हा तलाव 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. अनेक वर्षांपासून तलावाची डागडुजी, देखरेख करण्यात आली नाही. यामुळे यापूर्वीही गावकऱ्यांवर स्थलांतर करण्याची वेळ आली होती. तलावाच्या भिंतीवर मोठी झाडे वाढली आहेत. तलावाच्या पाळावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत.
आता लगेच तलाव फुटण्याची भीती नसली तरी सतत पडणारा पाऊस पाहता हा धोका नाकारला जाऊ शकत नाही. यामुळे अगोदरच बार्हा गावातील ४२ घरातील १५० जणांचे रसुलाबाद येथे स्थलांतर करण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास रसुलाबाद व हुसेनपुरचे सरपंच राजेश सावरकर, रवी कुरसंगे, रसुलाबादचे पोलिस पाटील श्याम काकडे, तलाठी रमेश भोळे तसेच रसुलाबादच्या नागरिकांनी मदतकार्य करत, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.
हेही वाचा : अप्पर वर्धा धरणाचा साठा 94 टक्क्यांवर; धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता
सध्या भीतीचे कारण नाही, पण भविष्यात जास्त पाऊस झाला तर धोकादायक होऊ शकेल. यामुळे याबद्दल वरिष्ठांनकडून मार्गदर्शन मागवले जाणार आहे. प्रकल्पातील पाणी ओसंडून वाहत आहे. यामुळे प्रकल्पातील पाणी एक मीटरने कमी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार सूचना करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता एस. बी. काळे यांनी दिली. या तलावाला आतापर्यंत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, उपविभागीय कार्यकारी अभियंता राजू दामोदरे, तहसीलदार पाराजे, तलाठी भोळे, पुलगावचे ठाणेदार रवींद्र गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
हेही वाचा : धक्कादायक! पुराच्या पाण्यात विजेच्या धक्क्याने 25 जनावरांचा मृत्यू