वर्धा- समुद्रपूर तालुक्यातील वायगाव येथील हळदीला जीआय मानांकन मिळाले आहे. यामुळे या भागात हळदीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यामुळे हळू हळू लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. पण, यंदा वातावरणाचा सर्वच पिकांना फटका बसला आहे. करपा रोगामुळे हळद पिकाचे नुकसान होत आहे.
मागील दोन वर्षापासून पारंपरिक पीक बदलून शेतकऱ्यांनी हळदीचा पेरा केला. पण, यंदा करपा रोगाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा करपा रोग नियंत्रणात यायला कठीण जात आहे. काही उपाययोजना करूनही रोग नियंत्रणात येत नसल्याने चिंता वाढली आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, तसेच आर्थिक फटका बसणार असल्याचेही शेतकरी अनिल गुडधे यांनी सांगितले.
वायगाव हळदीला महत्व का?
वायगाव हळदीला २०१६ या वर्षी भौगोलिक मानांकन मिळाले. असे असले तरी अगोदरपासूनच हळदीला मागणी आहे. मानांकनानंतर या मागणीत वाढ झाली. सोबतच परदेशातूनसुद्धा त्याची मागणी वाढू लागली आहे. हळदीत औषधी गुणधर्म असून कुरकुमीनचे प्रमाण हे ६ ते साडेसहा टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे या हळदीचा कॅन्सर सारख्या आजारावर औषध बनवण्यासाठी वापर केला जातो. हेच बाजारात मिळणाऱ्या हळदीमध्ये प्रमाण केवळ दोनच टक्के असते. त्यामुळेच, वायगावच्या हळदीला विशेष महत्त्व आहे. यामुळे या गावाला वायगाव हळद अशी सुद्धा ओळख मिळाली आहे.
बहुतांश हळदीची सेंद्रिय पद्धतीने लागवड...
यंदा समुद्रपूर तालुक्यात साधारण १ हजार ५०० एकरात सेंद्रिय पद्धतीने हळद पिकाची लागवड करण्यात आली आहे. या भागात भौगोलिक परिस्थितीमुळे कुरकुमीनचे प्रमाण जास्त असल्याने याला जिआय मानांकन मिळाले आहे. बाजारात मिळणाऱ्या हळदीपेक्षा या हळदीला मागणी अधिक आहे. यासाठी शेतकऱ्यांना पारंपरिक पिके सोडून हळद पिकाची शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
यंदा पेरा आणि पुढल्या वर्षी परत द्या....
यंदा पेरा आणि पुढल्या वर्षी परत द्या, ही विशेष संकल्पना राबवली जात आहे. शेतकऱ्यांना विनामुल्य हळदीचे बेणे वाटप करण्यात आले. पण, यंदा पिकावर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम दिसून येत आहे. करपा रोगाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पाडली आहे.
करपा रोग केव्हा आणि कसा येतो...
हळदीचा करपा रोग हा ऑगस्ट ते नोव्हेंबरच्या दरम्यान येत असतो. पहिल्यांदा येणारा करपा रोग हा टॅफरीना मॅक्यूलना या बुरशीपासून येतो. त्यानंतर पानावर करड्या रंगाचे ठिपक्यांच्या कोलेटोट्रिकम कॅपसिसम या बुरशीमुळे हा करपा रोग येतो. हळद पिकामध्ये पाने म्हत्वाची असतात. पाने वाचवण्यासाठी काळजी घेण्याची गरज असते. कारण करपा रोगात पाने गळतात. ती गेली तर पुन्हा येत नाही. याचा परिणाम उत्पादनात घट होते.
मागणी अधिक पण लागवड मोजकीच....
जीआय मानांकन, तसेच हळदीच्या औषधीय गुणधर्मामुळे तिला मागणी अधिक आहे. पण, लागवड क्षेत्र केवळ १ हजार ५०० एकर आहे. हळदीचे क्षेत्र कालानंतराने घटले आहे. यात आता हळूहळू वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
...या पद्धतीने करप्यावर नियंत्रण मिळवले जाते
हळद ही मसाला पदार्थ आणि औषधी गुणधर्मीय असल्याने मोठया प्रमाणात ती सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीने शेतात पिकवली जाते. यामुळे शेतकाऱ्यांनी करपा रोगाच्या नियंत्रणासाठी अर्धा किलो बाभळीचा पाला चार लिटर पाण्यात मिळसळून त्याला गरम करायचे आहे. हे मिश्रम दोन लिटर शिल्लक राहील, ते थंड करून त्याला दोनशे लिटर पाण्यात मिश्रण करून फवारणी करायची आहे. यात सात दिवसाच्या अंतरावर दोन ते तीनदा फवारणी केल्यास करपा रोगावर नियंत्रण मिळवता येते.
दशपर्णी अर्कचासुद्धा दोन ते तीन वेळा वापर करावा. सोबतच आंबट ताकाचा सुद्धा चांगला उपयोग होऊ शकतो. यात तीन टक्के आंबट ताक आणि पाच टक्के जिवावमृतची दोन ते तीन फेर फवारणी केल्यास चांगला फायदा होतो. यात रासायनिक शेती करणाऱ्यांनी कार्बेन्डाझिम १ ग्राम किंवा प्रोफेयकोनाझोल १ मि.ली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.
हेही वाचा- आता गप्प बसणार नाही..!, मंगलकार्यालय व्यावसायिकांचा आक्रमक पवित्रा