वर्धा - अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला मंजुरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यानंतर आदिवासी समाज बांधवांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा केला.
जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या संख्येच्या तुलनेत कार्यालयाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. यासाठी वारंवार निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते. आदिवासी समाजाला विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागपूरच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे आमदार डॉ.पंकज भोयर यांनी वर्ध्यात हे विकास प्रकल्प कार्यालय सुरु करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा : आदिवासी विकास मंत्र्याच्या निवासस्थानासमोर घंटानाद; 'सेव मेरिट, सेव नेशन' आंदोलन
सततच्या पाठपुराव्यामुळे वर्ध्यात प्रकल्प कार्यालय मंजूर झाले. मात्र, या कार्यालयाची इमारत व कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री,महाराष्ट्र शासन तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हा प्रश्न लावून धरण्यात आला होता. अखेर मंत्रिमंडळात या प्रकल्प कार्यालयाचा प्रश्न निकाली काढला असून, येत्या सोमवारी या कार्यलयाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आदिवासी समाजाने आमदार डॉ. पंकज भोयर यांचे आभार मानले.
या कार्यालयासाठी एक एकर जागेची गरज असून, जिल्हाधिकरी विवेक भिमनवार यांच्याकडे शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्र देण्यात आल्याची माहिती आमदार भोयर यांनी दिली. तसेच कार्यालयातील 36 पदांना मंजुरी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.