वर्धा - पावसाळ्यात वृक्षलागवड मोहीम राबवली जाते. पण जुलै महिन्याचा पंधरवडा लोटला, तरिही पावसाचा पत्ताच नाही. यामुळे वृक्षलागवड मोहीमच धोक्यात आली आहे. लागवड केलेले वृक्षच आता पाण्याअभावी मरू लागल्याने नवीन वृक्षलागवड थांबवण्यात आली आहे. हे भीषण वास्तव आहे महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील.
वृक्ष जगले नाही तर जमिनीत पाणी मुरणार कसे
पाणी नसल्याने वृक्ष जगणार कसे आणि वृक्ष जगले नाही तर जमिनीत पाणी मुरणार कसे असा प्रश्न आता पडू लागला आहे. जल ही जीवन है, यासाठी वृक्षलागवड करण्याचे सांगितले जाते. पण या वृक्षांना जगवण्यासाठी पाण्याची गरज असते. पावसाळ्यात वृक्षलागवड करत झाडे लावली जाते. पण यंदा पावसाने अजूनही दडी दिली आहे. याचा फटका आता वृक्षलागवड मोहिमेवर पडलाय. शतकोटी वृक्षलगवडीतून जिल्ह्यात 87 लाख वृक्ष लागवड होणार आहे. आता मात्र पावसाअभावी झाडे तहानली आहेत, झाडांनी जीव सोडायला सुरवात केली आहे.
धरणे अजूनही तहानलेली असल्याने नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे
वरुणराजा कोपला की काय? अशी विचारणा वर्ध्यातील शेतकरी करत आहे. सुरूवातीला थोडा पाऊस झाला यात शेतकऱ्यांनी पेरणी करून वेळ भागवली. पण उन्हाळ्यात कोरडी पडलेली धरणे अजूनही तहानलेली असल्याने नागरिकांच्या घशाला कोरड पडलेली आहे.
८७ लाख वृक्षलागवडीचे उद्दीष्ट पावसामुळे लांबणीवर
जिल्ह्याला ८७ लाख ५२ हजार २०० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात ८३ लाख ४८ हजार ३३२ वृक्ष लागवडीचे नियोजन झालेले आहे. यासाठी विविध जागेची निवड करत सध्या ६३ लाख ४६ हजार ४३५ खड्डे खणण्यात आले आहेत. त्यात १६ लाख ३९ हजार २७१ वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे.
भविष्यातील संकट रोखुन धरले नाही तर गंभीर परिणामांना समोर जावे लागणार
मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. याचे गंभीर परिणाम पशु पक्ष्यासह मानवावरही झाले आहेत. वाढते तापमान दुष्काळ, पावसाची दांडी याला जेमतेम सुरवात झाली आहे. एकदा का भूजलसाठा संपला तर गंभीर परिमाण दिसतील. यामुळे वेळीच भविष्यातील संकट रोखुन धरले नाही तर यापेक्षाही गंभीर परिणामांना समोर जावे लागणार यात शंकाच नाही.
नवीन वृक्ष लागवड थांबवत, लागवड झालेल्या वृक्षरोपांना पाणी देण्याचे काम सुरू
शासनाने दिलेल्या कार्यक्रमानुसार वृक्ष लावगडीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. पण, सध्या पाऊसच नसल्याने लावण्यात येणारे वृक्ष कसे जगवता येईल यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहे. नवीन वृक्ष लागवड थांबवत, लागवड झालेल्या वृक्षरोपांना पाणी देण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक उपवनसंरक्षक सुहास बढेकर यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.