वर्धा - सेवाग्राम आश्रमात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. गर्दीने येणारे पर्यटक पाहता कोरोनाच्या धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे एकावेळी ४ ते ५ पर्यटकांनी आतमध्ये जावे, त्यापेक्षा जास्त लोकांनी जाऊ नये, अशा प्रकारचा माहिती फलक (नोटीस) मुख्य दारावर लावण्यात आला आहे. यासह आश्रम परिसरात आतमध्ये हँडवाश सेंटरला सुरुवात करण्यात आली आहे.
![Sevagram](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-war-sevagram-aashram-pkg-7204321_19032020100611_1903f_1584592571_954.jpg)
सेवाग्राम आश्रमात कोरोनाच्या भितीमुळे अगोदरच पर्यटकांची संख्या रोडावली आहे. यात मुख्यतः हे लोक बाहेरून येत असतात. नागपूरसारख्या भागातून मोठ्या प्रमाणात लोक येतात. नागपूरात सध्या कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. जरी वर्ध्यात एकही रुग्ण आढळलेला नसला तरी खबरदारी म्हणून कलम 144 लागू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत चार पेक्षा जास्त लोकांनी आश्रम आणि बापूकुटीत जाऊ नये, अशा सूचना दिल्या जात आहेत.
आश्रमात पिण्याच्या पाण्याजवळ हँडवाश ठेवण्यात आले आहे. अगोदर हँडवाश करावे, त्यांनंतर आश्रमातील आदी निवास येथे नोंदनी करून पुढील आश्रम पाहण्यास सुरवात करावी. इथे असणाऱ्या मार्गदर्शिका गर्दी करू नये, अशा सूचना देऊन आश्रमाची माहिती देत आहेत. तसेच खबरदारी घेण्याचे आवाहनही केले जात आहे.
![Sevagram](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-war-sevagram-aashram-pkg-7204321_19032020100611_1903f_1584592571_417.jpg)
मुख्य आकर्षण म्हणजे बापू कुटी अगोदरच आकाराने छोटी असल्याने इथे ४ लोकांना आतमध्ये सोडले जात आहे. ते बाहेर निघाले की दुसऱ्या ४ लोकांना आतमध्ये सोडले जात आहे. लोकांनी इथल्या वस्तुंना स्पर्श करू नये. यासह लोकांचा प्रत्यक्ष संपर्क आणि गर्दी कमी करण्याचे खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या जात आहे. शिवाय आश्रमातील स्वयंसेवकांनी मास्क लावावे अशा उपाययोजना केल्या जात आहेत.
![Sevagram](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-war-sevagram-aashram-pkg-7204321_19032020100611_1903f_1584592571_11.jpg)