वर्धा - मार्च महिन्यातच वर्ध्याचे तापमान ४१.२ अंशावर गेले आहे. होळीनंतर तापमानात वाढ होते. त्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. होळीत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. आता तापमानात प्रचंड वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाचा प्रचंड त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र मार्चच्या अखेर तापमानाचा पारा ४१ अंश ओलांडून बसल्याने यंदाचे तापमान चांगलेच कहर करणार असल्याचे दिसू लागले आहे. लोकसभेची निवडणूक होऊ घातली असताना राजकीय वातावरण तापलेले आहे. तर तापमान वाढल्याने आतापासून दुपारी रस्ते ओस पडलेले दिसून येत आहे.
नागरिक बाहेर पडताना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी चेहऱ्याला बांधून रस्त्यावर निघताना दिसत आहेत. उकाड्याने नागरिक हैराण होत आहे. लोकांची धाव थंड पेय, निंबू सरबत आणि उसाच्या रसाच्या बंडीकडे दिसत आहे. हे तापमान हळू हळू वाढत जाणार असून येत्या काही दिवसात यात चांगलीच वाढ होऊन नागरिकांना त्रासदायक ठरणार आहे.