वर्धा - आमच्या चार कार्यक्रमावर पाणी फेरले तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या जीवनात पाऊसरुपी आनंदाचे क्षण येऊ दे, अशी प्रार्थना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 33 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम चांद्यापासून बांधापर्यंत राबवताना जिथे जिथे वृक्ष लागवड केली तेथे पावसाची कृपा झाल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
मुनगंटीवार यांच्या हस्ते सेलू येथील नवीन बसस्थानकाच्या कामाचे भूमीपूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सेलू हिंगणी ते हिंगणाच्या ३५० कोटी रुपयांच्या रस्त्याचेही भूमिपूजन करण्यात आले. कष्टकरी गरीब जनतेला बसस्थानकावर गेले असता साध्या सुविधाही मिळत नाहीत. विमानाने रोज १ लाख लोक प्रवास करतात. त्यांना इतक्या सुविधा दिल्या जातात. पण सामान्य कष्टकरी ६८ लाख लोक जे बसने प्रवास करतात त्याना सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे अर्थमंत्री होताच महाराष्ट्रातील बस्थानकाला निधी देण्याचे ठरवल्याचे मुनगंटीवार म्हणाले. ६५९ पैकी १७५ पेक्षा जास्त बस्थानाकाचे काम सुरू झाल्याचेही मुनगंटीवार झाले.
जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सेवाग्राम विकास आराखड्याचे काम हाती घेतले. यावेळी महात्मा गांधींचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवत काम करत राहिलो. यावेळी पंकज भोयर यांनी सेलू शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 30 कोटीच्या निधीची मागणी केली. त्यांच्या या मागणीला मुनगंटीवार यांनी मंजुरी दिल्याचे आश्वासन दिले.
जिल्ह्याला ९ राष्ट्रीय मार्गाने जोडल्याने विकास झाला असल्याचे वक्तव्य रामदास तडस यांनी केले. जिल्ह्यात मागील ५५ वर्षात जो विकास झाला नाही, एवढा विकास हा या ५ वर्षात झाला असल्याचे तडस म्हणाले. तर सुधीर मुनगंटीवार यांनी निधी दिल्याने विकास साधता आला असल्याचे आमदार पंकज भोयर म्हणाले.
या बसस्थानकावर साध्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. ग्रामीण भागातून मोठया प्रमाणात विद्यार्थी येजा करतात. आता मात्र सेलूचे बसस्थानाकात सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याचे बोलून दाखवले.
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत वरुड येथील रस्ते, नाले, विद्युतीकरण व सौदर्यीकरणाच्या १० कोटी रुपयांच्या तसेच पवनार येथील ६ कोटी ९ लाख रुपयांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच सेलू तालुक्यातील हिंगणा-हिंगणी-किन्ही-मोई-घोराड- सेलू-सुकळी (स्टे)- मदनी या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच सेलू बसस्थानकाच्या एकुण १५३ कोटी ५ लाख रुपयांच्या कामाचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले.