वर्धा- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला कोणाला आवडणार नाही. पण, त्यांची भेट होणे तेवढे सोपेही नाही. सर्वसामन्यांना ही भेट तर स्वप्नवतच आहे. वर्ध्याच्या नवव्या वर्गात शिकणाऱ्या चक्रधर प्रेमराज काळे या विद्यार्थ्याला ही स्वप्नवत वाटणारी पंतप्रधानाची भेट प्रत्यक्ष घ्यायला मिळणार आहे. 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमाच्या माध्यमातून थेट संधी त्याला मिळाली आहे. यामुळे त्याच्या परिवाराचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला आहे.
बोरगाव (मेघे) इथला चक्रधर काळे हा वर्ध्याच्या अल्फोन्सा शाळेचा विद्यार्थी आहे. सर्वसामान्य कुटुंबातील चक्रधर हा शांत स्वभावाचा पण पुस्तकांशी मैत्री करणारा आहे. मात्र, असे असले तरी केवळ पुस्तकी जगात न वावरता तो सामान्य जीवनातही रमतो. भजन, कीर्तन ऐकतो, वृत्तपत्र आवर्जून वाचतो. साजेसे पुस्तक आणि वास्तव जीवनावर आधारित विषयावर त्याने निबंध लिहून काढला. तीन दिवसांच्या अथक परिश्रमातून लिहिलेला निबंध त्याने सीबीएससी बोर्डच्या पोर्टलवर पाठवला. यात यंदा होणाऱ्या 'परीक्षा पे चर्चा' या परीक्षेत त्याला सहभागी होता येणार आहे.
पंतप्रधानांची डायलॉग बोलण्याची शैली आवडते
चक्रधर पंतप्रधानांच्या भाषण कौशल्याने प्रभावित आहे. त्यांचे डायलॉग बोलण्याची शैली, व्यक्तिमत्व आवडत असल्याचे चक्रधर सांगतो. त्यांच्या आवाजाची तो नक्कलही करून बघतो. मुलगा पंतप्रधान यांना भेटणार म्हटले तर कोणत्या आई-वडिलांना आनंद होणार नाही. त्याच्या घरी निवड झाल्याचा फोन आला. यात चक्रधरला आईकडून बातमी कळताच त्याने हा आनंद आईला मिठी मारून व्यक्त केला. त्याला या संधीने आकाशाला गवसणी घालणारा आनंद झाल्याच तो आणि त्याचे कुटुंबीय सांगतात.
अध्यात्मिक भजन, कीर्तनाची आवड
लहानपणापासून आईच्या संस्कारातून त्याला अध्यात्मिक भजन, कीर्तनाची आवड जडली. यामुळे तो केवळ पुस्तकी किडा न बनता त्याने इतरही छंद जोपासले. त्याला सामाजिक भान लाभले. तो आजूबाजूचे जग महत्वाचे असल्याचे सांगतो. याच बाबींची मांडणी त्याने निबंधत केली. यामुळेच की काय त्याच्या निबंधामुळे परीक्षा पास पासून ते थेट 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात जाऊन पोहोचला.
घरच्या संस्कारी वातावरण आणि कुटुंबातील प्रेमाचा मुलांच्या जडणघडनीत मोठा वाटा असतो. चक्रधरला मिळालेली संधी हेच सांगून जाते. शिक्षणासोबतच अनेकदा आध्यात्मही महत्वाचे ठरते. संधी मिळाल्यास शिक्षण आणि अध्यात्माशी संबंधीत प्रश्न पंतप्रधानांना विचारण्याची त्याची इच्छा आहे. चक्रधरच्या या यशाबद्दल 'ईटीव्ही भारत' कडून शुभेच्छा.