वर्धा - संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारच्या काळातील फूड सिक्युरिटी अॅक्ट मागील काही वर्षांत दुर्लक्ष झाला. शिवभोजन थाळीच्या माध्यमातून राज्यात त्याची पुन्हा आठवण होत असल्याचे पालकमंत्री सुनील केदार म्हणाले. तसेच कुठलाही गरीब माणूस उपाशी झोपता कामा नये, याकरिता शिवभोजन थाळी योजना सुरू केल्याचेही मंत्री केदार म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला.
पालकमंत्री केदार यावेळी म्हणाले, शिक्षणाला केंद्रबिंदू ठेवून पुढील आढावा बैठकीत पहिला ठराव हा शिक्षणाच्या विषयासंबंधित राहिल. शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे, असेही पालकमंत्री केदार यांनी सांगितले. तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सेवाग्राम विकास आराखड्याला अनुसरून आराखड्याला जोडून आणखी चांगले करण्याचा प्रयत्न राहील. ज्या राष्ट्रपित्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या 150 व्या जयंतीवर्षाला कुठलीही कमी पडू नये. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही म्हणाले.
हेही वाचा - 'शिवभोजन' योजनेतून गरीब व गरजू जनेतेची भूक भागणार - छगन भुजबळ
जिल्हा सामान्य रुग्णालयासह रेल्वे स्थानकासमोर शिवभोजन थाळी १० रुपयात गरजूंना उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून दररोज १०० जणांना याचा लाभ होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने क्रीडा संकुल येथे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा गौरव करताना सैनिकांच्या आईचा गौरव करण्यासाठी पालकमंत्री हे स्वतः व्यासपीठावरुन खाली आले. यासह निवडणूक काळात योग्यरित्या जबाबदारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना गौरवण्यात आले. यासह पोलीस विभागात चांगली कामगिरी केल्या प्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांचाही सत्कार करण्यात आला. यासोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी परेड निरिक्षण केले. तसेच सर्व स्वातंत्रसैनिक आणि हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करुन उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गृह विभाग, होमगार्ड, एन.सी.सी., स्काऊट, गाईड पथकांनी पथसंचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवड योजनेवर उत्कृष्ट चित्ररथ, आपात्कालीन वैद्यकीय सेवा, पोलीस विभागाचे श्वान पथक, दंगल नियंत्रण आणि वज्र वाहन पथक, आदी चित्ररथाव्दारे जनजागृतीपर संदेश देण्यात आला.
हेही वाचा - पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे लोकार्पण; मात्र, चव चाखणे टाळले
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बसे, जिल्हा पोलीस अधिक्षक बसवराज तेली, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक, मोठया संख्येने शालेय विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल राजपायले यांनी केले.