वर्धा - पोलीस म्हटले, की नकारात्मक भूमिका हीच काय पहिली नजर जनमानसात असते. परंतु, हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीला विदर्भातील आयएसओ मांनाकन असलेल्या समुद्रपूर पोलीस स्थानकाचे पोलीस धावून आले आहेत. आपल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयाप्रती आपले दायित्व म्हणून त्यांनी मदतीचा हात पुढे केला. १ लाख १ हजाराची मदत गोळा करत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांना ही रक्कम त्यांनी सुपूर्द केली.
पुलवामा येथे हुतात्मा झालेले खाकी वर्दीतील जवान हे आपल्याच कुटुंबातील आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांच्या मदतीला आपणच पुढे यावे, या हेतूने समुद्रपूर पोलीस स्थानकात निधी जमा करण्यात आला. समुद्रपूर पोलीस स्थानकाचे ठाणेदार प्रवीण मुंडे, ३ पीएसआय आणि ४३ कर्मचारी असे एकूण ४७ जणांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत १ लाख १ हजाराचा निधी जमा केला. सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलला आणि बघता बघता १ लाख जमा झाल्याने ही मदत करू शकलो. याचा आनंद असल्याचे मत ठाणेदार प्रवीण मुंडे यांनी व्यक्त केले.
लोकसहभागातून स्मार्ट पोलीस स्थानकाकडे वाटचाल
समुद्रपूर पोलीस स्थानक हे विदर्भातील पहिले आयएसओ मानांकनाचा दर्जा मिळवणारे पोलीस स्थानक आहे. स्मार्ट पोलीस स्थानकाकाडे वाटचाल करताना लोकसहभाग घेवून हे स्थानक पुढे चालत आहे. पण हे करताना ज्या समाजात आपण राहतो त्याची बांधिलकी ठेवत आपले कर्त्यव्याचा भान जपताना दिसून येत आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना केलेली मदत ही काही पहिली वेळ नाही. केरळ राज्यात पुराणे थैमान असतानासुद्धा २१ हजार रोख आणि ४७ कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार देत मदत केली होती.