वर्धा - वर्ध्यातील बहुचर्चित हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात ( Hinghanghat Case Result ) प्रतीक्षेत असलेला निकाल आज (9 फेब्रुवारीला) येणार आहे. 5 फेब्रुवारीला निकाल येणार होता. पण निकाल देण्यास न्यायालयाने असमर्थता दर्शवल्याने 9 फेब्रुवारीला निकाल निश्चित देणार, अशी माहिती सरकरी वकील यांनी दिली होती. आरोपी विकेशला फाशीची द्या, अशी मागणी केली जात असली तरी आरोपीला फाशी होणार की जन्मठेप हे न्यायाधीशांच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात 21 जानेवारी 2022 ला दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पुढच्या तारखेला निकाल देणार असल्याची माहिती न्यायमूर्तींनी सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली होती. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या पीडित प्राध्यापिकेला जाळण्याचा घटनेला 3 फेब्रुवारीला दोन वर्षे पूर्ण झाले आहे. यात दोन वर्षांपासून असणारी प्रतीक्षा आता संपणार आहे.
काय होती त्यादिवशीची घटना -
पीडित तरुणी ही हिंगणघाट येथील महाविद्यालयात कार्यरत होती. घटनेच्या दिवशी कॉलेजला जाताना आरोपी विकेशने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात गंभीर भाजल्या गेल्याने 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षण सत्यविर बंडीवार यांनी २८ फेब्रुवारीला आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले. पण जलदगती न्यायालयात प्रकरण चालणार असताना कोविडमुळे जवळपास 9 महिने कामकाजाला विलंब झाला. कोरोनाची पहिली लाट शांत होताच 14 डिसेंबर 2020 पासून सुनावणीला सूरुवात झाली.
77 पैकी 29 जणांची साक्ष महत्त्वाची -
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने पीडितेची बाजू मांडण्याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. प्रकरणाची पहिली सुनावणी 4 मार्च 2020 रोजी हिंगणघाट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. त्यानंतर न्यायालयाने जलदगतीने कमी वेळेत 64 सुनावण्या घेतल्या. या प्रकरणात पोलिसांकडे एकूण 77 साक्षीदार होते. ज्यामध्ये प्रत्यक्ष घटना पहाणारेही साक्षीदार होते. विशेष म्हणजे यातील एकही साक्षीदार फितूर न झाल्याने न्यायालयात पीडितेची बाजू सक्षमपणे मांडण्यात सरकारी वकील उज्वल निकम यांना यश आले.
पण आरोपी म्हणतो मी गुन्हा केलाच नाही -
सरकारी वकिलांकडून 77 पैकी 29 साक्षीदारांची साक्ष न्यायालयापुढे महत्त्वाची ठरली. यामध्ये काही प्रत्यक्ष साक्षीदार होते. उलट तपासणी दरम्यान जेव्हा आरोपी विकेशला हे कृत्य का केले? अशी विचारणा झाली त्यावेळेस मात्र विकेश नगराळेने 'मी हा गुन्हा केलाच नाही' हेच उत्तर दिल्याचे साहायक सरकरी वकील दीपक वैद्य यांनी माध्यमांना दिली.
आरोपीच्या फाशीची मागणी -
मागील काही काळापासून महिलांवर अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात दिवसागणिक वाढत गेल्या आहेत. यामुळे अशा आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशीच मागणी सामाजिक संघटना, असो की सामान्य नागरिक यांच्याकडून केली जात होती. यात हिंगणघाटच्या प्रकरणातही घटनेच्या पहिल्या दिवसापासूनच आरोपी विकेश नगराळेला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. आजही ती मागणी दोन वर्षापासून कायम आहे. पीडितेला न्याय देण्यासाठी फाशीच द्यावी अशी, मागणी होत असताना न्यायालय मात्र काय निकाल देणार, याकडेचा आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जळीतकांड प्रकरणातील घटनाक्रम -
- 3 फेब्रुवारी 2020 सकाळी 7 वाजताच्या सुमारास घटना घडली
- पीडीतेने 10 फेब्रुवारीला उपचरा दरम्यान नागपुरात शेवटचा श्वास घेतला
- घटनेनंतर आरोपीला लगेच अटक झाली. पण मध्यरात्री न्यायालय उघडून कारागृहात रवानगी केली होती
- प्रकरणाची गंभीरता पाहता सरकारने उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती
- घटनेपासून आरोपी विकेश नगराळे कारागृहातच
- कोरोनाची पहिली लाट येताच कामकाज थांबले अन सुनावणी तब्बल 9 महिने लांबली
- आतापर्यंत प्रकरणात 29 साक्षीदाराची तपासणी झाली
हेही वाचा - Goa Assembly Election :..म्हणून अमित शहांविरोधात तृणमूल काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकार्यांकडे तक्रार