वर्धा- जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अंकुर कंपनीच्या प्रभाकर वाणाचे बियाणे पेरले होते. मात्र, या बियाणांची उगवण क्षमता नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यासाठी अंकुर कंपनीच्या विरोधात तक्रार करूनही जिल्हा कृषी अधीक्षक विद्या मानकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, असे म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कृषी अधीक्षक कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी अधीक्षक उपस्थित नसल्याने तेथील कर्मचाऱ्यांना बेशरमाचे झाड देऊन प्रहारच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.
अंकुर कंपणीचे बियाणे न उगवल्याने कारवाईची मागणी करूनही अद्याप कुठलेच पाऊल उचलले गेले नसल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आला. अंकुर कंपनीवर कारवाई का होत नाही, असा सवाल यावेळी करण्यात आला. या आंदोलनात देवळी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तत्काळ मदत करण्यात यावी. तसेच दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी प्रहारकडून करण्यात येत आहे.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे विकास दांडगे यांच्यासह सरपंच राजेश सावरकर, सचिन बोबडे, यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.