वर्धा - रामनगरमध्ये राहणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे परिसराला कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, आर्वी तालुक्यातील मनेरी येथे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे तो भाग यापूर्वीच कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
रामनगर येथील रहिवासी असणारे ५९ वर्षीय गृहस्थ नागपूर मधील अजनी रेल्वेस्थानक येथील कर्मचारी आहेत. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी सेवाग्राम रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मंगळवारी त्यांचा अहवाल प्राप्त होताच, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या घराच्या आजूबाजूचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान त्यांच्या घरातील 5 व्यक्तींना जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
आजच्या तीन कोरोना बाधित रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 13 झाली आहे. त्यांपैकी जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 4 आहे. याशिवाय एक रुग्ण नागपूर, तर एक सिकंदराबाद येथे उपचार घेत आहे. 6 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत कोणत्या तालुक्यात आढळलेच कोरोना रुग्ण..
वर्धा जिल्ह्यातील पहिला रुग्ण हा आर्वी तालुक्यात आढळला होता, ज्याच्या मृत्यूनंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. सर्वाधिक ५ रुग्ण आर्वी तालुक्यातील आहे. तसेच, आष्टी आणि सेलू येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. हिंगणघाट तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच कारंजा, देवळी आणि समुद्रपूर तालुक्यात अद्याप एकाही कोरोना बाधिताची नोंद झाली नाही.
- वर्धा - 4
- आर्वी - 5
- आष्टी -1
- हिंगणघाट -2
- सेलू - 1
एकूण -13 (पैकी 1 मृत्यू)