वर्धा - प्रगतशील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर नेत प्रगतशील शेतीचे प्रयोग दाखवले जातात. असे प्रयोग पाहत स्वतःची शेती प्रगत करण्याचा शासनाच्या चांगल्या उद्देशाला 'अ'प्रगत करण्याचे काम काही कर्मचारी करत आहेत. असाच पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यावर हिंगणघाटच्या शेतकऱ्यांसोबत घडलेल्या प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
हिंगणघाटच्या तालुका कृषी विभागामार्फत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत २ कृषी सहायक सहकार्य करण्यासाठी दिले. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी हिंगणघाट येथील ७९ जणांना घेऊन दौरा ६ फेब्रुवारीला निघाला. यात २६ महिलांचा समावेश होता. आळंदी येथे राहण्याची व्यवस्था करत शेतशिवार दाखवले जाणार होते. यासाठी ५ हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांकडून पावती न देता घेण्यात आले.