वर्धा - नाशिक जिल्ह्यात झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेनंतर उपाययोजना सुरू करून तब्बल 5 मेट्रिक टन ऑक्सिजन बचत केली जात आहे. यासाठी कोविड रुग्णालयात अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात संपूर्ण तपासणी नंतर ऑक्सिजन खपत जवळपास 5 मेट्रिक टनाने घटली. यामुळे एकीकडे तुटवडा असतांना गळती थांबल्याने इतर रुगांना त्याचा फायदा होताना दिसून येत आहे.
कोरोना बाधित रुग्ण वाढत असून उपचाराकरीता मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन गरज भासत आहे. यामुळे गळती थांबवून अपघात टाळण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजन टाक्या, टाकीपासून ऑक्सीजन पुरवठा करणारी गॅस वाहिनी, तसेच रुग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडरसाठे, रुग्णालयात योग्य पद्धतीने ऑक्सिजन वापरला जातो की नाही याची तपासणी करण्यात आली. गळतीची ठिकाणे शोधून तत्काळ दुरुस्ती करण्यात आली.
गळती थांबून पाच टनाची बचत -
जिल्ह्यात 600 ऑक्सिजन बेडसाठी 16 ते 17 मेट्रिक टन प्रति दिवस ऑक्सिजनची गरज आहे. 17 मेट्रिक टन ऑक्सिजन मध्येच 750 ते 800 ऑक्सिजन बेडच्या रुग्णांना पुरावला जाऊ शकतो. या ऑडिटमुळे सुमारे 5 मेट्रिक टन ऑक्सिजनची गळती थांबून तो इतर रुगांचा जीव वाचवण्यासाठी फायद्याचा ठरत आहे. प्रत्यके रुग्णाची खपत 16 लिटर लागत होती. त्यात घट होऊन 11 लिटर झाली आहे.
ऑक्सिजन बचतीने समाधान -
ऑक्सिजन गळती शोधणे, दुरुस्ती करणे आणि रुग्णालयात ऑक्सिजन योग्य पद्धतीने वापरला जावा यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ञ व्यक्तींची मदत घेण्यात आली. ऑक्सिजनची बचत करून जास्त रुग्णांना ऑक्सिजन पुरवता येतोय याचे समाधान असल्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.