वर्धा - कार्यसम्राट म्हणून उल्लेख होत असलेल्या आमदाराच्या मतदारसंघात पायाभूत सुविधा नसल्याने महिलेला नवजात प्रसूतीच्या वेदना सहन करत ३ किमी पायदळ चालावे लागले. एकीकडे काळाकुट्ट अंधार असतांना ९ महिन्यांही ही गर्भवती दवाखान्यात न पोहचू शकल्याने तिची रस्त्यातच प्रसूती झाली. सकिना किरण पवार असे प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे. सध्या तिचं बाळ आणि ती वडणेरच्या ग्रामीण रुग्णालयात सुखरूप असून उपचार घेत आहे.
कार्यसम्राट आमदार समीर कुणावर यांचा हिंगणघाट संघातील वडणेर ग्रामीण रुग्णालयापासून 17 किमी वर असलेले सेलू हे गाव. तेथूनपूढे 3 किमीवर असलेला १५-२० घरांचा सेलू पारधी बेडा(तांडा) हा विकासाच्या दृष्टीन दुर्लक्षितच राहिला आहे. याच बेड्यात राहणाऱ्या सकिनाला मध्यरात्री वेदना सुरू झाल्या. 9 महिन्याची गर्भार असलेल्या सकिनाला रुग्णालयात कसे न्यावे हा प्रश्न घरच्यांपुढे होता. त्यावेळी नेमके काय कारावे कळत नव्हते. कुठलीच सुविधा नसल्याने आई, वडील, भाऊ यांच्यासह सकिना कशीबशी ३ किमीटर अंतर कापत अखेर सेलू गावातील आशा सेविकेच्या घरी पोहचली. आशा सेविकेने रुग्णवाहिकेला फोन लावला. मात्र, फोन करूनही रुग्णवाहिका येत नसल्याने अखेर पहाट होताना आशा वर्करने एका ऑटोच्या व्यवस्था केली.
हेही वाचा - पृथ्वीला वाचवण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज - तिबेटचे माजी पंतप्रधान
भूमिपूजनाला ५ महिने लोटले तरी अद्याप रस्त्याच्या कामाला सुरुवात नाही -
रोज हजारो कोटींचे कामे होत असताना शहरातील लोकांना मिळणाऱ्या सुविधा पाहता खेड्यांडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. सेलू या गावची परिस्थीती अशीच काहीशी असून भूमिपूजनाला ५ महिने लोटले तरीही रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर, दुसऱ्या गावी जाण्यासाठी गावकऱ्यांना जंगलातून जीव धोक्यात घालून जावे लागते. अशा गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष केव्हा जाणार, सकिनासारख्या गर्भवती महिलांच्या उपचाराकरता, प्रसूतीच्या क्षणी वेळेत वाहन कधी मिळणार यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा - वर्धा रेल्वे स्थानकावर मद्यपींचा धुडगूस, प्रशासनाने लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी