वर्धा- वर्ध्यात आज साधेपणाने घटस्थापना करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत मंडळांच्या संख्येत मोजक्याच प्रमाणात घट झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ८२५ मंडळांमध्ये घटस्थापना झाली आहे. यात अनेक मंडळांनी मूर्ती स्थापना न करता केवळ फोटोसह घटस्थापना करून आदिशक्तीची पूजा अर्चा केली. तसेच, भक्तीमय वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात केली.
जिल्ह्यात दरवर्षी नवरात्री उत्सव उत्साहाने साजरा होतो. रस्ते विद्युत रोषणाईने नाहून निघतात. जिकडे नजर जाईल तिकडे आकर्षक सजावट, भव्य दिव्य मंडप, असे चित्र पाहायला मिळते. पण, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने नवरात्री उत्सवाला सुरवात झाली. एक ठराविक अंतर सोडला की दुर्गा उत्सव मंडळांचे देखावे यंदा कोरोना जनजागृतीची महिती देणारे झाले आहे.
जिल्ह्यात यावर्षी ८२५ ठिकाणी घटस्थापना झाली आहे. यात मागील वर्षी ९११ मंडळांनी ढोल ताशांच्या गजरात नवरात्र उत्सवासाठी परवानगी घेतली होती. यंदा मात्र, ८६ मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. तेच काहींनी पूजा अर्चा करण्यासाठी केवळ घटस्थापणा केली. यात व्यापारी मित्र मंडळाची अनेक वर्षाची परंपरा असलेली कलकत्त्यावरून येणारी दुर्गा मूर्तीची स्थापना न करता घट मांडून पूजा करण्यात आली.
सराफा लाईन परिसरात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' सांगणाऱ्या फलकाचे भव्य स्वागत दार लावून जनजागृती केली जात आहे. आर्वी नाका येथील भव्य दिव्य देखावा असणारे मंडप आकर्षनाचे केंद्र असते. मात्र, यावेळी मोजकीच विद्युत रोषणाई करत नवरात्री उत्सवाला सुरवात करण्यात आली आहे.
अनेक उपक्रमांना कोरोनाचा फटका..
नवरात्री उत्सवात अनेक दुर्गा उत्सव मंडळांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम नऊ दिवसात घेतले जातात. यंदा मात्र कोरोनामुळे त्यावरही संक्रात आली आहे. यात काही मंडळात मेडिकल कॅम्प घेत रोग निदान करून मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया केली जायची. मात्र, कोरोना काळात गर्दी टाळण्याच्या उद्देशाने हे सर्व उपक्रम रद्द करण्यात आले आहे. यामुळे यंदाच्या उत्सवात, सुरक्षित राहा मास्क घाला आणि समाजिक अंतर ठेवून कोरोनाला दूर सारा हेच संदेश दिले जात आहे.
हेही वाचा- दुचाकी चोरी करणाऱ्या 24 वर्षीय युवकाला वर्धा पोलिसांनी केली अटक