वर्धा - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. प्रशासन आणि नागरिकांनी जिल्ह्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी असेच प्रयत्न पुढेही करावेत, अशा सूचना नगर विकास व आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. ते जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत बोलत होते.
वर्धा जिल्ह्याचा रहिवासी असलेला कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या जीवनावश्यक व इतर वस्तूंच्या वाहनासोबत येणाऱ्या व्यक्ती जिल्ह्यातील स्थानिकांसोबत मिसळणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्याने राबवलेले अनलोडिंग वाहनतळ हे इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा मार्गदर्शक आहे. इतर जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्या व्यक्तीसोबतच संपूर्ण घर क्वारंटाईन करण्याचा निर्णयही चांगला आहे. यामुळे कोरोनाला 90 टक्के आळा बसेल, असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला.
खरीपाचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बियाणे आणि खतांची टंचाई होणार नाही, याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांचा कापूस तत्काळ विकला जाईल यासाठी व्यवस्थित नियोजनपूर्वक काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कोरोनाच्या या लढ्यात जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी चांगले सहकार्य केले आहे. जिल्ह्यातील 8 हजार 400 मजूर, कामगार, जिल्ह्यातील विविध 61 निवारागृहात होते. येथील सामाजिक संस्था, कंपन्या, कंत्राटदार यांच्यामुळे जिल्हा प्रशासनाला या कामगारांची काळजी घेणे सोपे झाले. ८ हजारपैकी 4 हजार कामगारांना परत त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यात घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत रेशन कार्ड नसणाऱ्या 10 हजार 90 कुटुंबापैकी 8 हजार 132 कुटुंबांना रेशन कार्ड वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित रेशन कार्ड या महिनाअखेरीस वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली.
या बैठकीला आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे हे उपस्थित होते.