वर्धा - येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई केली असून गोवंश तस्करीचा डाव या पथकाने उधळून लावला आहे. वर्धा जिल्ह्यातून विविध ठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग असल्याने या भागातून ही तस्करी मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे आता ही मोठी कारवाई करत 25 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
कत्तली करता जाणाऱ्या 35 गोवंश जनावरांचा ट्रक स्थानिक गुन्हे शाखा हिंगणघाट व पुलगाव टीमच्या वतीने सापळा रचून जप्त केला आहे. यातील 35 जनावरांची मुक्तता करण्यात आली. तसेच प्राणी संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करत आरोपीस अटक करण्यात आली आहे. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शेडगाव फाट्यावर नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 25 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यातील 35 जनावरांना हिंगणघाट येथील गोरक्षण येथे सोडण्यात आले आहे.
हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्गाने मागील अनेक दिवसांपासून गोवंशांची तस्करी केली जात असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. या कारवाईनंतर आता तस्करी करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहे. नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एमपी 04 एच ई 3515 क्रमांकाच्या ट्रक मध्ये 35 गोवंश जनावरांना कोंबून क्रूरपणे निर्दयतेने कत्तली करिता वाहतूक केली जात असताना ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली व पोलिसांनी नाकेबंदी करून ट्रक चालकास व ट्रक मध्ये जनावरास ट्रकसह ताब्यात घेतले.
या प्रकरणात समुद्रपूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींकडून इतर तस्करीचा देखील खुलासा होण्याची शक्यता आहे. हिंगणघाट व समुद्रपूर भागातील काही व्यक्तींकडून या अनधिकृत रित्या होणाऱ्या व तस्करीला मदत केली जात असल्याचे देखील बोलले जात आहे. आरोपींची नावे देखील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दरेकर, पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपळवळे ,पोलीस हवालदार सुभाष राऊत, राजेश तीवसकर, पोलीस अमलदार अभी बनसोड विकास अवचट ,राकेश आष्टनकर शंकर राठोड, अमोल ढोबळे स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी संयुक्तरित्या केली.