वर्धा - जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ठाणेगाव जवळ मजूर घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज (१३ मे) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये ४ जण गंभीर जखमी, तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले.
भिवंडी येथून ३३ मजुरांना घेऊन कंटेनर इलाहाबादला जात असताना राष्ट्रीय महामार्ग सहावर सकाळी अपघात झाला. यावेळी चालकाला डुलकी आल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन दुभाजकावर धडकून उलटले. यामध्ये असलेले प्रवासी किरकोळ जखमी झाले. तसेच चौघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपारासाठी दाखल करण्यात आले.
खबरदारी म्हणून जखमींवर पीपीई किट घालून उपचार -
सर्व मजूर भिवंडी या रेड झोनमधून आले होते. मात्र, त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे होते. त्यामुळे खबरदारी म्हणून डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. इंदुलकर आणि डॉ. खुजे डॉक्टरांनी पीपीई किट घालून त्यांच्यावर उपचार केले. जखमींपैकी एकाच्या डोकं, हात आणि छातीला दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोनाचा परिस्थिती आम्हाला होणारा त्रास महत्वाचा नसून रुग्ण सेवा अधिक महत्वाची आहे. सुरक्षेसाठी पीपीई किट घालून उपचार करताना नक्कीच त्रास सहन करावा लागत असला, तरी तो या काळात रुग्णसेवेपुढे गौण असल्याची भावना डॉ. अनुपम हिवलेकर यांनी बोलून दाखवली.