वर्धा- शहरात अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाच्या सरी बरसल्याचे पाहायला मिळाले. या वादळी वाऱ्यामूळे शेतकऱ्यांसह अनेकांना भरपूर नुकसान झाले आहे.
वायफड येथे दुपारी चार वाजताच्या सुमारास गारपीट झाली. वादळी वाऱ्याने पुन्हा उग्र रूप धारण केल्याने छतावरील टिनाचे पत्रे उडालीत. यात २० ते २५ घरांचे नुकसान झाले, तर लोणसावळी येथे सुद्धा १० ते १२ घरांची पडझड झाली आहे. या भीषण वादळामूळे रस्त्यावरील मोठी झाडे सुद्घा उनमळून पडलीत. त्यामूळे वर्धा वायफड मार्ग बंद झाला आहे. हिंगणघाट तालुक्याच्या ममदापूर (बोरगाव) गावातील गोठ्यावर वीज पडल्याने गोठ्यात बांधून असणारी बैलजोडी ठार झाली. यात नारायण धुर्वे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांसह अनेकांना नुकसान सोसावे लागत आहे. वादळी वाऱ्याने विजेचे खांब पडले त्यामूळे अनेक गावांना बुधवारची रात्र अंधारात काढावी लागली.
दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नुकसानीचा सपाटा लावल्याचे दिसते आहे. यामुळे सध्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. ज्यांच्या घराचे छत टीनाचे आहे त्यांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते आहे.