वर्धा - जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात सोयाबीणची लागवड करुनही उगवण क्षमता नसल्याने पीक उगवलेच नाही. या बिया इंदौरच्या ईगल सिड्स कंपनीचे लागवड केलेल्या तक्रारीत 530 पैकी 329 तक्रारीत बियाणे दोषी असल्याचे आढळून आले. नुकसान भरपाई म्हणून 117 शेतकऱ्यांना 189 बॅग सोयाबिन बियाणे वितरण करण्यात आले. यात 4 लाख 85 हजार 750 रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली. पण, ही मदत तुटपुंजी असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात बोगस बियाण्यांच्या 530 तक्रारी कृषी विभागल्या मिळाल्यात. या तक्रारीच्या आधारे तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने पाहणी केली. यात तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती, सदस्य सचिव, कृषी विज्ञान केद्रांचे शास्त्रज्ञ यांचा समावेश होता. यात संपुर्ण 530 तक्रारीची तपासाणी करुन पंचनामे करत अहवाल तयार करण्यात आला. त्यापैकी एकुण 329
तक्रारींमध्ये तालुका स्तरीय समीतीच्या तपासणी मध्ये बियाणे सदोष आढळुन आले. बियाणे सदोष असल्यामुळे ईगल सिड्स प्रा. ली. इंदोर या कंपनीवर हिंगणघाट कृषी अधिकारीऱ्याच्या तक्रारीवरुन जुलै महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत गुणनियंत्रण निरिक्षकामार्फत खरीप हंगामामध्ये आतापर्यंत बियाणे 452, रासायनिक खते 315 व किटकनाशक 265 कृषी केद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या वेळी आढळून आलेल्या त्रुटीनमधून बियाणे 47, रासायनिक खते 17 व किटकनाशक 6 अशा एकुण 70 कृषी केंद्रांना विक्रीबंद आदेश देण्यात आले आहे.
शासनामार्फत जिल्हा परिषद कृषी विभागाला अप्रमाणित बियाणे 270, किटकनाशके 49 व रासायनिक खतांचे 192 नमुने घेण्याचा लक्षांक देण्यात आला होता. त्या अनुषंगाने आतापर्यंत बियाणे 169, रासायनिक खते - 122आणि किटकनाशक 18 नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले. विश्लेषणाचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये बियाणे - 10 नमुने, रासायनिक खते - 7 नमुने अप्रमाणीत घोषीत झाले. याबाबत 6 कंपनी आणि 6 कृषी केद्रांवर न्यायालयीन खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
तसेच पंचायत समिती सेलु अंतर्गत केळझर येथे बोगस बिटी बियाणे सापडल्याने पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी संबधीतावर 20 जूनला गुन्हा दाखल केला आहे. कृषी विभाग व जिल्हा परिषदच्या भरारी पथकाने बोगस खत, बियाणे सापडल्याने संयुक्त कार्यवाही करुन 21 जूनला संबधीतावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहीती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण यांनी दिली आहे.
हेही वाचा - वर्ध्यात प्रहारने कृषी अधीक्षकांच्या खुर्चीला सोयाबीन रोपांसह दिले निवेदन