वर्धा - आशिया, अफ्रिका आणि युरोप खंडातून स्थलांतरित होणारा फेरुगीनस डक किंवा फेरुजिनस पोचर्डची मराठीत नयनसरी बदक अशी ओळख आहे. ही प्रजाती धोक्यात असल्याचीही नोंद आहे. वर्ध्याच्या वायफड परिसरात हा बदक पाहायला मिळाला आहे. बहार नेचर फाऊंडेशनच्या पक्षी निरीक्षणात प्रथमच पक्षाची नोंद झाल्याने पक्षी मित्र सुखावले आहे शिवाय पक्षी वैभवात भर पडली आहे.
काय आहे ओळख आणि कुठे आढळतो?
या बदकाच्या प्रजाती उथळ ओल्या प्रदेशात राहतात, ज्यात हिरव्यागार उगवलेल्या आणि किरणोत्सर्गी वनस्पती असणाऱ्या भागातील माशांचे तलाव, किनारपट्टीचा भाग, ठिकाण शोधत स्थलांतरित करतात. हा नयनसरी बदक मध्यम आकाराच्या साधारण लांबी ३५ ते ४० सेमी आणि वजन ४५० ते ७५० ग्रॅम असते. नर व मादी दोन्ही गडद तांबूस पिंगट आणि पाठ आणखी गडद रंगाची असते. नर बदकाचे डोळे चमकदार फिकट पांढऱ्या आणि मादीचे तपकिरी रंगाचे असतात. पोट आणि पंखांच्या खालचा भाग पांढरा असतो. ही बदके उडाल्यानंतर त्यांच्या वरच्या पंखांवर दोन्ही बाजूने पांढरी पंखपट्टी पाहावयास मिळते. पांढरी पंखपट्टी व नराचे चमकदार फिकट पांढरे डोळे पाहून याची ओळख ठरते.
काय खातो वर्ध्यासह आणखी कुठे झाली नोंद?
या बदक प्रजाती डुबकी मारून पाण्यात आहार शोधतात. जलाशयात उपलब्ध वनस्पती, अपृष्ठवंशी, किडे, घोन्घे, कठीण कवच असणारे आणि लहान मासे हा त्यांचा आहार आहे. ई-बर्ड या संकेतस्थळावरील नोंदीनुसार विदर्भात यापूर्वी यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात या पक्षाची नोंद आहे. यामुळे वर्ध्यात बहार नेचर फाऊंडेशनचे राहुल वकारे यांच्या निदर्शनास आल्यांनातर त्याची बहारने नोंद घेतली.
पक्षी मित्र आणि अभ्यासकांचे निरीक्षण
नयनसरी बदक मोठ्या संख्येने स्थलांतर करून येत नाही. तर ते शेंडी बदक, मोठी व छोटी लालसरी यांच्यासोबत मोजक्याच संख्येत विदर्भात येतात, अशी माहिती यवतमाळमधील पक्षी अभ्यासक प्रवीण जोशी, नागपूरचे नितीन मराठे, चंद्रपूरचे रुंदन काटकर आणि वाशिम येथील मिलिंद सावदेकर यांनी दिली. यासोबतच २००४पासून याचे विदर्भात आगमन होत आहे. पक्षी तज्ज्ञ राजू कसंबे, जयंत वडतकर, गजानन वाघ, प्रशांत निकम पाटील, सौरभ जवंजाळ, किरण मोरे, रवी धोंगळे, मंगेश तायडे, शिशिर शेंडोकर, शुभम गिरी, कन्हैया उदापुरे व इतर पक्षीमित्रांनी स्थानिक तलावांवर याची नोंद केली आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या प्रजातींचे "सकट समीप" प्रजाती म्हणून सूचीबद्ध केले आहे. हे बदक स्थलांतर करतांना एकाच ठिकाणी जास्त वेळ राहत नसल्याचेही लक्षात आले आहे.
वर्ध्यात प्रथम आढळून आल्यानंतर पक्षी निरीक्षणामध्ये वन्यजीव अभ्यासक पराग दांगडे, नितीन भोगल, सृष्टी भोगल आणि वर्धा जिल्ह्याचे मानद वन्यजीव संरक्षक संजय इंगळे तिगावकर यांचे सहकार्य लाभले असल्याचे पक्षी मित्र राहुल वकारे यांनी सांगितले.