वर्धा - जेवण वाढायला उशीर केल्यामुळे बापाने मुलीच्या डोक्यात सेंट्रींगची पाटी मारुन खून केल्याने खळबल उडाली. ही घटना सेलू तालुक्यातील हमदापूर येथे बुधवारी दुपारी घडली. विलास ठाकरे असे त्या मारेकरी बापाचे नाव आहे. खून केल्यानंतर मारेकरी विलास यानेच 100 क्रमांकावर फोन करुन पोलिसांना घटनेविषयी माहिती दिली.
डोक्यात मारली सेंट्रींगची पाटी - मारेकरी विलास हा गावातील मंदिरात पुजारी म्हणून काम करतो. बुधवारी दुपारी जेवण वाढण्यावरुन त्याचा मुलीशी वाद झाला. यावेळी रागात विलासने मुलीच्या डोक्यावर पाटी मारली. जोरदार प्रहार झाल्याने त्याची मुलगी जमिनीवर पडली. यात ती रक्तबंबाळ झाली. वर्मी घाव बसल्याने मुलीने जाग्यावरच जीव सोडला. यावेळी घरी आई, आजी सर्वच उपस्थित होते.
खून केल्यानंतर वडिलानेच डायल केला 100 क्रमांक - रागाचा भरात विलासने अल्पवयीन मुलीच्या डोक्यावर पाटी मारली. यात ती जखमी झाली. थोड्या वेळात मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून विलास शांत झाला. मात्र त्याला घटनेनंतर पाश्चातापाशिवाय काहीच शिल्लक नव्हते. विलासने 100 नंबर डायल करुन पोलिसांना घटनेची माहिती दिली. थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याला विचारपूस केल्यानंतर त्याने घडलेली घटना पोलिसांपुढे कथन केली. ठाणेदार ठाणेदार योगेश कामले, पोलीस कर्मचारी दीपक निंबाळकर, किशोर वंजारी, मनोज बोरले, एजाजखान यांनी घटनास्थाळाचा पंचनामा केला. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद करत आरोपी विलास ठाकरेला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.