वर्धा - कमी कालावधीत कमी खर्चाचे पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे पाहिले जाते. अनेक शेतकरी या नगदी पिकाकडे वळले. विशेष म्हणजे सोयाबीन पीक हे दिवाळीत मिळणारे एक प्रकारचे बोनसच ठरते. पण, मागील चार ते पाच वर्षात बदलत्या हवामानाने शेतीचे हे चित्र आता बदलू लागले आहे. यात यंदा निसर्गाचा लहरीपणा चांगलाच भोवला आहे. नुकत्याच कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार जवळपास जिल्ह्यातील 80 टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मात्र आर्थिक अडचणीत सापडला आहे.
यंदा निसर्गाचा लहरीपणा सुरुवातीपासून दिसून आला. पहिले लावले ते उगवले नाही. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. काही ठिकाणी बोगस बियाण्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पडली. यंदा सुरुवातीपासून सोयाबीन पिकाने हैराण केले. यात सुरुवातीला पेरणी योग्य झालेला पाऊस आणि नंतर पडलेला खंड, त्यानंतरचे ढगाळ वातावरण या सगळ्यात सोयाबीन पिवळे पडले. दाणा भरला नाही आणि पीक पावसाने भिजले.
80 टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.
यंदा 1 लाख 17 हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड वर्ध्यात करण्यात आली होती. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीन लागवड क्षेत्रात वाढ झाली. यात पावसाचा खंड आणि ढगाळ वातावरणामुळे पिकाचे वाढ झाली नाही. खोड किडी आणि चक्रीभुंग्याने सोयाबीन झाड आतून पोखरल्याने शेंग भरली नाही. यामुळे यंदा जवळपास 80 टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीन पिकाचे 31 टक्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणातून पुढे आले असल्याची माहिती कृषी अधीक्षक अनिल इंगळे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
काढणी परवडणार नसल्याने काढले मोडायला
अखेर पीक काढणी शेतकऱ्यांना परवडणार नसल्याने ट्रॅक्टर फिरवून सोयाबीन मोडायला काढले आहेत. आर्वी येथील शेतकरी श्रीकृष्ण दारोकार यांनी 10 एकरात सोयाबीन लागवड केली, घाम गाळून पीक जगवले. पण, सगळे निसर्गाने हिरावरून नेले. काढणीला गेले तर दाणा भरलाच नव्हता. पीक काढणीला लागणार खर्च उत्पादनापेक्षा अधिक असल्याने सोयाबीन पीक मोडायला काढले. त्यालाही सहा हजार रुपये देऊन ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय शेतकऱ्याने घेतला.
अशी परिस्थिती कोणावर येऊ नये
ट्रॅक्टर चालवण्याचा आमचा व्यवसाय आहे. यात आम्ही मशागतीपासून नांगरणी, पेरणी ही कामे करताना आनंद असतो. पण, यंदा मात्र पीक मोडण्याचे काम येत आहे. रोज फोनवर-फोन असून सोयाबीन मोडायचे आहे, असा फोन येतो. ट्रॅक्टर जमिनीवर चालतो पण घाव काळजावर होत आहे. शेतकऱ्याने काबाड कष्ट करून पिकवले, पण निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावले आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवण्याची अशी वेळ कोणावर येऊ नये, असे ट्रॅक्टर म्हणत आहेत.
सोयाबीन पिकासाठी लागलेला खर्च
यात नांगरणी 7 हजार, व्हीपाससाठी 7 हजार, रोटाव्हेटर आणि बियाणे यासाठी 20 हजार, खते आणि पेरणीत 11 हजार, तणनाशक फवारणी, पीक वाढीस औषध आणि लागलेला 30 हजार रुपयांचा खर्च, मजुरी यासह इतर खर्च लागून जवळपास 1 ते सव्वा लाखाचा खर्च लागला आहे.
शेतकऱ्याच्या मुलाने शेती का करू नये हे कळलं
कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने पुण्याची नोकरी सोडून मयूर दारोकार गावाकडे आला. वडिलांसोबत जाऊन तो यंदा शेतात राबला. त्यानेही कष्ट उपसले, वाटले प्रयोगशील शेती करू. पण, निसर्गाची मार पाहून शेतकरी बापाला आपल्या मुलाने शेती करू नये, असे का वाटते? या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पण, सर्वजण शेती सोडून शहरात जाणार असतील तर शेती करायला कोणीच नसेल? असा भयाण प्रश्न भविष्यात पडणार असल्याचे तो बोलून दाखवतो. यामुळे सरकारने लक्ष घालून वेळोवेळी मदत देऊन आधाराची अपेक्षा करतोय. तेच शेतकऱ्याला आता मिळणाऱ्या मदतीतून खर्चही निघणार नसल्याने जास्तीस जास्त मदत मिळावी, अशी आशा तो करतो आहे.