वर्धा - आर्वी तालुक्यातील तलावावर संकटग्रस्त पांढरा गिधाड पक्षी आढळून आला. तलाव परिसरात पक्षी निरीक्षणादरम्यान या गिधाडाची नोंद घेत त्यास कॅमेरात कैद करण्यात आले. संकटग्रस्त असललेल्या या पांढऱ्या प्रजातीच्या गिधाडाची दुसऱ्यांदा नोंद झाली आहे. याची नोंद पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार राहुल वकारे यांनी केली.
हेही वाचा - 'खरा दहशतवादी कोण? याचा कंगनाने अभ्यास करावा'
यापूर्वी नोव्हेंबर 2016 मध्ये वर्धा शहराजवळ एका परिसरात हा गिधाड दिसून आला होता. यावेळी आर्वी तालुक्यातील तलाव परिसरात पक्षी निरीक्षण सुरू असताना हा पक्षी दिसून आला. यावेळी त्याच्या हालचालींना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.
अन्नाचा शोधात 80 कि.मी करू शकतो प्रवास....
या पक्ष्याचे इंग्रजी नाव इजिप्शियन वल्चर असून याची लांबी 58 ते 70 से.मी, तर वजन 1.6 ते 2.2 किलो एवढे असते. हे भारतात आढळणाऱ्या प्रजातींपैकी लहान आकाराचे गिधाड आहे. हा पक्षी सडलेले मांस खातो. लहान सस्तन प्राणी, पक्षी, मासे, अंडी आणि सडलेले फळ यांच्या शोधात हा गिधाड एका दिवसाला 80 किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकतो. मेलेल्या पक्ष्यांचे मांस खाण्यासाठी हे गिधाड तलावाजवळ दिसत असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रजाती संकटात असल्याने संवर्धनाची गरज...
या पक्ष्याला पशुवैद्यकीय औषध डायक्लोफेनाकने विषबाधेचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हे पक्षी ज्या मृत जनावरांचे मास खातात यातून त्यांना विषबाधा होते. त्यामुळे, या पक्ष्याची प्रजाती संकटात आली असल्याचे समजले आहे. भारतात अत्यंत वेगाने पांढऱ्या गिधाडची संख्या घटत आहे. या पांढऱ्या गिधाडाच्या दर्शनाने खडकाळ भागात दगडांवर त्याच्या अधिवासाची शक्यता नाकारता येत नाही. या पक्ष्याचे अधिवास असणाऱ्या परिसरात संवर्धनाच्या अनुषंगाने पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - मुनगंटीवारांना निराशेने ग्रासले आहे; जयंत पाटलांचा टोला