वर्धा - निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात आता राहिलेले पीकही जंगली जनावरे उद्ध्वस्त करत आहेत. या जनावारांनी शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या पिकाचे नुकसान केले आहे.
कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा येथील लक्ष्मणराव लाड यांच्या शेतात जंगली जनावरांनी धुमाकूळ घातला आहे. जंगली रानडुक्करांनी रात्रीच्या वेळेला शेतात घुसले. यात कपाशीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेतकऱ्यांनी धडपड करून पीक नुकसान भरपाईसाठी अर्ज केला तर त्यांना फक्त 1 हजार 500 रुपये मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचे कसं? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
त्यामुळे सरकारने योग्य ती कारवाई करून घटनास्थळी येऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. एकीकडे शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात सापडला आहे तर उरले-सुरले पीक जंगली जनावरे फस्त करत आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.