वर्धा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंद करण्यात आलेली मंदिरे अखेर भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. विदर्भातील अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध असलेले वर्ध्याच्या केळझर येथील सिद्धिविनायकाचे मंदिरही खुले झाले आहे. भाविकांनी श्रीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात मंदिर बंद असल्याने भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत होते. मात्र आता मंदिरे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे भाविक मंदिरात जावून देवाचे दर्शन घेत आहेत. केळझर येथील सिद्धिविनायक मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंदिरात प्रवेश करतांना भाविकांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. तसेच दोन भाविकांमध्ये सुरक्षित अतंर ठेवण्याबाबत देखील मंदिर व्यवस्थापनाकडून सूचना दिल्या जात आहेत.
मंदिराबद्दल पुरातन आख्यायिका
असे म्हणतात की, या मंदिरातील गणेश मूर्तीची स्थापना भगवान राम यांचे गुरू वशिष्ठ ऋषी यांनी केली. त्यांनी नित्य पूजा करण्यासाठी सिद्धिविनायकाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. तसेच पूर्वी या परिसराचे नाव एकचक्र नगरी असे होते. याच ठिकाणी कुंती पुत्र भिमाने बकासुराचा वध केला होता.