वर्धा - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींची ५ एप्रिलला वर्ध्यातील स्वावलंबी मैदानावर सभा होणार आहे. कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना उन्हाचा तडाखा बसू नये, यासाठीही सभा दुपारी ४ वाजता घेण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १ एप्रिलला स्वावलंबी मैदानावर सभा झाली होती. त्याच मैदानावर गांधी यांची ५ एप्रिलला सभा होणार आहे. वर्धा लोकसभेच्या उमेदवार चारुलता टोकस (राव) यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. या सभेला गर्दी करण्यासाठी ग्रामीण भागासह जोरदार तय्यारी केली जात आहे.
या सभेत गांधी मंगळवारी जाहीर झालेल्या काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर बोलतील, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी ईटीव्ही सोबत बोलताना दिली. वर्धा हा भाजपचा गड राहिलेला आहे. त्यामुळे चारुलता टोकस-राव यांच्या प्रचारार्थ होत असलेली सभा उमेदवार आणि काँग्रेसच्या दृष्टीने अधिक महत्वाची असणार आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे जाहिरनाम्यासह मोदींनी केलेल्या टीकेला काय उत्तर देतील. तसेच गरिबी हटाओचा नारा कितपत यशस्वी होईल, याकडे सध्या लोकसभा मतदार संघातील लोकांचे लक्ष लागले आहे.