वर्धा - ग्रामीण भागात आजही पाहिजे त्या सोयी सुविधा पोहचू शकलेल्या नाहीत. यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणे म्हणजे एक स्वप्नच. पण, वर्ध्या लगतच्या छोट्याशा गावातली सुजलला योगा शिक्षक रामची साथ लाभली. यामुळे तो तुर्कीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत चमकला आहे. कोरोना काळात ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत सुजलने भारताचे प्रतिनिधित्व करत जगात सहावा क्रमांक पटकावला आहे. यामुळे सुजलसह त्याचे योगा शिक्षक राम हाडके यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
पुलई या छोट्याशा राम हाडके हे मागील तीन वर्षांपासून लहान मुलांना योगाचे धडे देतात. विशेष म्हणजे राम यांनी स्वतः योगासनाचे धडे ऑनलाइन पद्धतीने युट्यूबवरून घेतले आहे. ते सुरूवातीला युट्यूबवरुन योगासनाचे धडे घेत त्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवत असे. गावातील 10 ते 15 मुलांना ते योगासन शिकवतात. त्यांचाच विद्यार्थी असलेला सुजल विनायक कोहळे हा वर्धा तालुक्यातील पुलईच्या जिल्हा परिषदेत शाळेत सातव्या वर्गात शिकतो. त्याचे कुटुंबिय शेतकरी आहेत. मात्र, राम यांप्रमाणेच त्याला योगासनांमध्ये आवड निर्माण झाली.
दरम्यान, तुर्कीमध्ये आंतरराष्ट्रीय योग ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने योग स्पर्धा मागील महिन्यात ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 60 देशातील 1 हजार 350 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. युट्युबवरुन प्रशिक्षण घेत सुजलला राम यांनी दिलेले प्रशिक्षण व सततच्या सरावाच्या जोरावर सुजलने हे यश संपादित केले. कोरोना काळामुळे ही स्पर्धा ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. यामुळे छोट्या गावातील शेतकऱ्याच्या मुलाला एक चांगली संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले.
या स्पर्धेच्या यशाची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षक सभापती जयश्री सुनील गफाट यांनी खासदार रामदास तडस यांना दिली. त्यांनी लागलीच गावात येऊन त्यांनी त्याचा सत्कार केला. एवढेच नव्हे तर विदर्भ केसरी खासदार तडस यांनी त्यांच्या खेळण्याचे पालकत्व स्वीकारत योग आणि खेळाडू घडवण्यासाठी मदतीची तयारी दर्शवली.
सुजलने योग शिक्षक व्हावे असे त्याच्या वडिलांना वाटते. विद्यार्थ्यांमुळे राम हाडके यांनी योगाचे शिक्षण घेत प्रशिक्षक होण्याचा मार्ग निवडला. आयुष्याच्या वळणावर कोण कोणासाठी प्रेरणा ठरेल हे माहीत नसते. यात सुजल आणि प्रशिक्षक राम एकमेकांना आयुष्याची वाट दाखवणारे ठरले. सुजलच्या यशाने एक नवा आनंद आणि उत्साह पुलईत निर्माण झाला आहे.
हेही वाचा - जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण