वर्धा- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षी विविध संकटांना तोंड द्यावे लागत आहे. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. सध्या सोयाबीन पीक शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र,सोयबीनला एकही शेंग आलेली नाही. ही परिस्थिती आमदार समीर कुणावर यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासमोर मांडली. यावेळी कृषी मंत्र्याना शेंगा नसलेली सोयाबीन दाखवण्यात आली आहे. आमदार कुणावर यांनी सरकारडून शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत केली जावी, अशी मागणी करण्यात आली. कृषी मंत्री दादाजी भुसे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीसाठी ते आले होते.
जिल्ह्यातील अनेक भागात सोयाबीन पीक खराब झाले आहे. झाडाला शेंगा नसल्याने शेतकऱ्यांना यापासून कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. सोयाबीन पिकाचे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे, असे समीर कुणावर यांनी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यामधील हजारो हेक्टर पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. मागील 15 वर्षात असे पूर्ण पीक हातून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नाही.
कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पिकाचे नुकसान झालेल्या काही भागात जाऊन पाहणी केली असल्याचे सांगितले. कृषी शास्त्रज्ञांच्या मदतीने काही औषधांची फवारणी करुन पीक जगवता येईल का याचाही प्रयत्न करु, असे भुसे म्हणाले आहेत. जिथे पूर्ण नुकसान झाले आहे. त्याचे सर्वेक्षण करुन एनडीआरएफच्या माध्यमातून मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, भुसे यांनी म्हटले.
कृषी मंत्र्याचे आगमन होताच भाजप शिवसेनेची नारेबाजी
कृषी मंत्री जिल्हा परिषद सभागृहाच्या आवारात आढावा बैठक घेण्यासाठी पोहोचताच नुकसान झालेल्या सोयाबीनची झाडे भाजपकडून देण्यात आली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी 50 हजार रुपये आर्थिक मदत मिळावी, असे नारे लावले. शिवसेना कार्यकर्त्यांनी दादाजी भुसे यांच्या स्वागताचे नारे लावले. अखेर सभागृहात पोहोचताना मंत्र्यानी स्वतः नारेवबाजी थांबवा, असा इशारा दिला.