वर्धा - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुशांतसिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार आहे. यामुळे जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढेल. या प्रकरणाची मुंबईत ज्या पद्धतीने हाताळणी झाली त्यावर महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आज वर्ध्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. वर्ध्यात सेवाग्राम रुगणालायत कोरोनाच्या परिस्थितीचा आढवा घेऊन जिल्हाधिकारी कार्यलयात त्यांनी एक बैठक घेतली. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआय लवकरच चौकशी सुरू करेल. सुशांतसिंहच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या करोडो चाहत्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा करूयात, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील सर्व पुरावे सीबीआयला देण्याचे आदेशही मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, भाजपाच्या आशिष शेलार, किरीट सोमैया, राम कदम या नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.