मुंबई - हिंगणघाट जळीत कांड प्रकरणातील दोषी विकेश नगराळेला आज मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 2020 साली आजच्याच दिवशी जळीतकांडात होरपळून पीडितेने अखेरचा श्वास घेतला होता. आज दोन वर्षांनी नराधम विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. यावर बोलताना, आज खऱ्या अर्थाने पीडितेला न्याय मिळाला, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जरी म्हटले असले तरी, अशा नराधमाला फाशीच झाली पाहिजे, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ ( BJP leader Chitra Wagh ) यांनी म्हटले.
काय म्हणाल्या चित्रा वाघ
हिंगणघाटच्या निर्भयाला जाळून मारणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. परंतु, अजूनही वेळ गेलेली नाही. त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने आता प्रयत्न करायला हवेत. खरे तर, अशा नराधमांना फासावरच लटकवायला हव. ही माणसे नाहीत, ही तर हैवान आहेत, असे सांगत न्यायालयाचा निकाल तर आला. परंतु, शासनाने या परिवाराला दिलेल्या लेखी आश्वासनांची पुर्तता अद्याप केलेली नाही, हे दुदैवी आहे. वारंवार या प्रकरणी भाजपने आवाज उठवला आहे. परंतु, अद्याप सरकारने त्या पीडितेच्या परिवाराला मदत केली नाही, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले.
विक्की नगराळेला शिक्षा म्हणजे भारतीय न्याय व्यवस्थेचा विजय - मंत्री केदार
हिंगणघाट येथील पीडितेला जाळून मारणाऱ्या नराधम विक्की नगराळे याला शेवटी जन्मठेपेची शिक्षा झाली. ही शिक्षा म्हणजे भारतीय न्याय व्यवस्थेचा विजय आणि मृत अंकिताच्या कुटुंबीयांना संतोष मिळाला असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
वर्ध्या जिल्ह्यातील या बहुचर्चित हत्याकांडाचा निकाल हा महिलांवर अत्याचार करणाऱ्या सर्व नराधमांना एक चपराक आहे. या निर्णयामुळे अंकिता परत मिळणार नाही हे सत्य असले तरी, पीडितेच्या कुटुंबीयांना व समाजाला न्याय व्यवस्थेने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची झालेली हानी ही न भरून निघणारी आहे. परंतु, थोड्या फार प्रमाणात या निर्णयामुळे त्यांचे सांत्वन झाले. पीडितेच्या आत्म्याला शांती मिळेल, अशा भावना सुनील केदार यांनी व्यक्त केल्या.
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन
वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मंत्री सुनील केदार यांनी या खटल्यात सरकारी पक्षातर्फे खटला लढणारे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांचे विशेष आभार मानले. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे आणि यापुढे देखील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची गय महाविकास आघाडीचे शासन कदापि करणार नाही. शासन अंकिताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Bala Nandgaonkar : किंगमेकर नाही तर 'किंग' म्हणा - बाळा नांदगावकर