वर्धा - जिल्ह्यात महिलेच्या मृत्यूनंतर तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यावेळी तिच्या अंत्यविधीला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. यामुळे अनेकांना क्वॉरंटाईन करत प्रशासनाला अडचणींना पुढे जावे लागले. या घटनेपासून धडा घेत यापुढे संशयित रुग्णाच्या मृत्यूनंतर अंत्यविधी करताना काळजी घेणे. तसेच इतर विधी सुद्धा टाळाव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले.
वर्ध्यात दोन मोठे रुग्णालय आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. यात सावंगी रुग्णालयात वाशीम येथून आलेला रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह निघाला आणि ग्रीन झोनमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्याला सेवाग्रामच्या रुग्णालयातील कोरोना केअर सेंटरला हलवण्यात आले. यामुळे येत्या काळात असे रुग्ण आल्यास किंवा एखाद्याच्या मृत्यू झाल्यास त्यापासून इतरांना लागण होऊ नये यासाठी उपाय योजना म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी भीमनवार यांनी केले.
काय घ्यावी काळजी -
पार्थिव उघडणे, आंघोळ घालणे, हार घालणे, नमस्कार करणे अशा प्रकारचे कोणतेही विधी होणार नाही. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष द्यावे. संबंधितांच्या कुटुंबीयांना लेखी पत्र देवून अंत्याविधीच्या सूचना द्याव्यात. तसेच संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित रुग्णालयाने त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी. यामुळे पोलिसांनाही लक्ष ठेवता येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
यावेळी पोलीस अधिक्षकांनी कंटेंटमेट क्षेत्रात आत व बाहेर जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार राहील याची काळजी घ्यावी. तिथे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्याक्तींना पासेस द्याव्यात, रात्री-अपरात्री वैद्यकीय कारणासाठी लोकांना सोडता येईल. मात्र, त्यांची माहिती संबधित अधिकाऱ्यांना देण्यात यावी. बाहेरून येणारे लोक स्थानिक लोकांमध्ये मिसळणार नाही याची दक्षता घेतल्यास आपण या आजाराची लागण इतरांना होऊ नये यासाठी प्रयत्न करू शकतो, असेही ओम्बासे म्हणाले.