वर्धा - शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीसोबत जाऊन युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या गेटला कुलूप ठोकले.
शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियासमोर भूमिपुत्र संघर्ष वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. विदर्भाची अशीच परिस्थिती असल्याने लवकर तोडगा काढण्याचे समितीने आवाहन केले.
शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करत आहे. याचा निषेधार्थ भूमिपुत्र संघर्ष वाहीनीने आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांंसाठी लवकरात लवकर पिककर्जाचे वाटप झाले पाहिजेे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकाकडे केली. यावेळी योग्य प्रतिसाद न दिल्याने हे आंदोलन करण्यात आले.
जर बँकांनी शेतकऱ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही, तर विदर्भात एकाही बँकेचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका भूमिपूत्र संघर्षचे अध्यक्ष अभिजीत फाळके यांच्याकडून घेण्यात आली. शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांना अशाच पद्धतीने टाळे ठोकू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोट्यवधींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये किसान क्रेडिट कार्डमधून कर्ज अशा घोषणा करण्यात आल्या आहेत.