वर्धा - या यात्रेचे नाव जरी जनआशीर्वाद यात्रा असले तरी मी स्वतःसाठी या यात्रेला तीर्थयात्रा समजतो. तीर्थयात्रा म्हणजे फक्त चार धाम फिरणे नव्हे, आपण मंदिरात, वेगवेगळ्या धर्मस्थळी गेले पाहिजे. आशीर्वाद घेतले पाहिजे पण मातोश्रीचे माझ्यावर संस्कार झाले आहेत, ते मला हेच सांगतात जेव्हा आपण राजकारणात, समाजकारणात असतो तेव्हा लोकांची सेवा करणे हेच आपले कर्तव्य, जनता जनार्दनच आपला खरा देव असतो. म्हणून, तुमची पूजा, सेवा करायला महाराष्ट्रात फिरत असल्याचे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेनिमीत्त जाहीर सभेत बोलले.
आदित्य ठाकरे हे तिसऱ्या टप्यातील आशीर्वाद यात्रे दरम्यान आर्वी येथे आले होते. गांधी चौक परिसरात ही सभा पार पडली. काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा एका दिवसापूर्वी याच ठिकाणी पार पडली होती.
ही यात्रा सरकार बनवायचे आहे म्हणून नाही, किंवा कुणाला मंत्री, कुणाला मुख्यमंत्री बनवायचे आहे म्हणून ही यात्रा नाही. मला शेवटच्या घटकापर्यंत पोहचायचे आहे, त्यांचा आवाज कदाचित मुंबईत पोहचत नाही, म्हणून तोच आवाज, तोच वारा वादळ निर्माण करण्यासाठी इथे आलो असल्याचे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.