वर्धा - सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू असतांना वर्ध्यात कंपनी चालक मनमानी करताना दिसून आले. जिल्हा प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत त्यांना केराची टोपली दाखवण्याचे काम केले जात होते. यावर उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी उत्तम गॅलवा स्टील कंपनीला 5 लाखांचा दंड करत काम बंद केले. यानंतरही देवळी एमआयडीसीतील महालक्ष्मी स्टील कंपनीत सुद्धा हाच प्रकार उघडकीस आल्याने 35 हजाराचा दंड ठोठावत कारवाई करण्यात आली.
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. अशा परिस्थितीत विविध कारणे देत कंपनीचे काम सुरू ठेवण्यात आले होते. यावर उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी काही एसओपीचे पालन करण्याच्या सूचना दिल्यात. कर्मचाऱ्यांची कपात करत काम करण्याच्या सूचना दिल्या. शिवाय कंपनीच्या आतमधील परिसरात राहणाऱ्या कामगारांना बोलावत हळुहळु मशनिरी बंद करत काही कालावधीत पूर्ण काम बंद करण्याचे आदेश दिले. यासह सोशल डिस्टनसिंग पाळत स्वछता ठेवण्याचे आदेश सुद्धा दिलेत.
पण, प्रत्यक्षात सेलू काटे येथील उत्तम गलवा आणि त्यांनंतर आता महालक्ष्मी स्टील या दोन्ही कंपन्यांनी नियमांचे पालन न करता कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ चालवला. यामुळे प्रत्यक्ष पाहणीत नियमांचा भंग केल्याने पहिल्यांदा या कंपनीला 5 लाखाचा दंड ठोठावत काम बंद करण्याचे आदेश दिले.
![वर्धा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-war-company-karvai-photo-7204321_04042020230502_0404f_1586021702_879.jpg)
आज देवळी एमआयडीसी परिसरातील महालक्ष्मी स्टीलच्या कंपनीला भेट देताच अस्वच्छतेचा कळस पाहायला मिळाला. अतिशय गंभीर परिस्थितीत आजाराला निमंत्रण देत काम करताना कर्मचारी आढळून आले. यावेळी सोशल डिस्टनसिंगच्या नियमाला धाब्यावर बसवत काम चालू असल्याचे निदर्शनास आले. काही कर्मचाऱ्यांनी आपबिती मांडल्यानंतर उपविभागीय अधिकारी बगळे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. तसेच तहसीलदार राजेश सरवदे यांना 25 हजाराचा दंड तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी 10 हजाराचा दंड ठोठावत कंपनीने काम बंद करून देण्याच्या सूचना दिल्या.
![वर्धा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-war-company-karvai-photo-7204321_04042020230502_0404f_1586021702_376.jpg)
या आदेशाने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. पोटच्या भाकरीसाठी जीवावर उद्धार होऊन काम करावे लागत असल्याचे बोलून दाखवले. शिवाय कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी. यासह येथील स्वछतेची सुधारणा न केल्यास करवाई करण्याचे आदेश दिलेत. यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांचे टाळ्या वाजवून आभार मानले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहयला मिळाले.