वर्धा - वन्य प्राण्यांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कारंजा तालुक्यातील बांगडापूर येथे जंगल परिषद भरवण्यात आली होती. वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतातील उभ्या पीकांचे नुकसान आणि प्राण्यांचे हल्ले यात वाढ झाल्याने सर्वांनी एकत्र येत या परिषदेच्या माध्यमातून विचार मंथन केले.
कारंजा तालुक्यातील आगरगाव येथे एक युवा शेतकरी वाघाच्या हल्ल्याचा बळी ठरला. परिसरातील शेतकरी या घटनेने चांगलेच भयभीत झाले आहेत. याच कारणाने गावातील लोकांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कारही टाकला होता. प्रश्न सुटत नसल्याने हे लोक एकत्र आले आहेत. जंगला संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी जंगलातच परिषद घेऊन त्यावर विचारविनिमय करण्यात आला.
हेही वाचा - अकोला : वन्यप्राण्यांकडून पिके फस्त - शेतकरी त्रस्त
यावेळी शेतकरी जागर मंचाची स्थापना करण्यात आली. जंगलाला कुंपण घालावे, वन्यप्राण्यांमुळ जीवित हानी झाल्यास 25 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, वन्यप्राण्यांच्या त्रासापासून संरक्षण मिळावे, नुकसानीचे पंचनामे तातडीन करावे, भविष्यात उदभवणाऱ्या समस्यांच्या अनुषंगान उपाययोजना कराव्या, अशा मागण्यांचा सर्वानुमते ठरावदेखील यावेळी घेण्यात आला. मार्ग न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारासुद्धा या नागरिकांनी दिला आहे.