वर्धा - लोकसभा निवडणूकीला खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली आहे. आज लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस होता. दरम्यान, आज ९ इच्छुकांनी २० नामांकन अर्ज भरण्यासाठी नेले. पहिल्या दिवशी कोणी नामांकन दाखल केले नसले तरी इच्छुकांची नावे मात्र महत्वाची आहेत.
वर्ध्यातील पहिलाच अर्ज नेणारे इच्छुक म्हणजे आशिष सोनटक्के यांनी अपक्षचा अर्ज घेतला. तर भास्कर नेवारे आणि लोकजागर पार्टीचे ज्ञानेश वाकुडकर यांच्यावतीने १-१ अर्ज घेण्यात आला. तसेच काँग्रेस पक्षाच्या चारुलात टोकस यांच्यासाठी ४ अर्ज घेण्यात आले. अद्याप काँग्रेसकडून उमेदवार जाहीर झाला नसला तरी उमेदवारी निश्चित समजून अर्ज नेण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार धनराज वंजारी यांनी ४ अर्ज घेतले. तर राजेश बालपांडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज घेतला.
आंबेडकर रिपब्लिकन पार्टीचे प्रवीण गाढवे यांनी ४ अर्ज घेतले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांचासाठी २ अर्ज घेण्यात आले. ३ वाजेपर्यंत अर्ज घेण्याची वेळ असताना शेवटचा अर्ज अरविंद लिल्लोरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज घेतला. पहिल्या दिवशी कोणी अर्ज भरला नसला तरी लोकशाहीच्या २०१९ च्या उत्सवाला खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात झाली आहे. २५ मार्च हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.
यात मजेदार म्हणजे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून वर्ध्यातील उमेदवार घोषित झाला नाही. असे असले तरी विद्यमान खासदार रामदास तडस हे आघाडीवर आहेत. तसेच काँग्रेसकडूनही ही चारुलात टोकस यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तिढा न सुटल्याने अद्याप उमेदवार घोषित झालेला नाही. यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्यावतीनेसुद्धा २ अर्ज घेण्यात आले आहेत. आज अर्ज भरला नसला तरी लोकसभा लढवण्यासाठी तब्बल ९ उमेदवारांनी नामांकन अर्ज घेऊन इच्छुक असल्याचे दाखवले. अर्ज परत घेण्याची वेळ अजून बाकी असल्याने या नावामागे चर्चा तोपर्यंत होणारच आहे.