वर्धा - कोरोनाची रुग्णसंख्या बिकट होत असताना ऑक्सिजन गरज महत्त्वाची ठरत आहे. यासाठी उत्तम गॅलवा स्टील प्लँटमधून ही गरज पूर्ण होत आहे. यासाठी 1, 500 खाटांचे जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. यासोबत 770 बेड दोन्ही रुग्णालयात वाढवण्यात येणार आहे. यांसाठी प्लँटजवळ असलेल्या दोन इमारत अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याची पाहणी पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्यासोबत जाऊन घेतली आहे.
दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचा अंदाजही आरोग्य विभागाने दिला. भविष्यातील वाढती रुग्णसंख्या वाढ, त्यामागे बेड, ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर्स आदी बाबींचे नियोजन आताच करणे आवश्यक आहे. त्यासाठी भुगाव येथील सुरेश देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आणि भारतीय विद्या भवन लॉइड्स विद्या निकेतन भुगाव रोड सेलूकाटे येथे इमारती ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी 1, 500 खाटांचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात 200 खाटाच्या युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयासाठी आवश्यक वीज जोडणी, आयसीयुसाठी आवश्यक साधन सामग्री, इत्यादी बाबी तातडीने मार्गी लावण्यासाठी काम करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
उत्तम गॅलवाने उत्पादन कमी करुन आयनॉक्सच्या 264 मेट्रिक टन ऑक्सिजनपैकी 25 ते 30 टक्के ऑक्सिजन द्यावे यासाठी होकार दर्शवला असून; यात पाइपलाइन टाकून तत्काळ तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी उत्तम गलवाचे अध्यक्ष बिरेंद्रजी, मुख्य कार्यकारी अधिकारी बिजॉय कुमार, मानव संसाधन सहायक महाव्यवस्थापक प्रशांत जावदंड, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता श्री वानखेडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश माथूरकर, अभिजित सपकाळ आदी उपस्थित होते.
सावंगी सेवाग्राम रुग्णालयत 770 खाटा अधिक वाढवण्याच्या सूचना..
सेवाग्राम आणि सावंगी रुग्णलयात अतिरिक्त खाटा वाढवाव्यात प्रस्ताव सादर करत सेवाग्राम येथे 400 बेड असून 550 बेड वाढवणे तसेच, तर सावंगी येथे 618 बेड असून आणखी 220 बेड वाढविण्याच्या सूचना पालकमंत्री केदार यांनी दिल्या आहे. यापैकी निम्मे बेड ऑक्सिजन सहित ठेवण्याच्या सूचना त्यांनी तात्काळ काम सुरू करण्याचेही सांगण्यात आले आहे. यावेळी सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. नितीन गंगने, डॉ. बी. एस. गर्ग, डॉ. एस. पी. कलंत्री, सावंगी रुग्णालयाचे डॉ. अभ्युदय मेघे, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, मनोज खैरनार, नितीन पाटील आदी उपस्थित होते.
वर्ध्यातील नियोजन..
- जम्बो कोविड हॉस्पिटलसाठी दोन इमारतीचे अधिग्रहण.
- उत्तम गॅलवा स्टील कंपनीतून पाइपलाइनने होणार ऑक्सिजन पुरवठा.
- वर्ध्यात 1018 बेड उपलब्ध अधिक 2270 बेड वाढणार.
- सुरेश देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, भारतीय विद्या भवन लॉइड्स विद्या निकेतन या दोन्ही इमारती अधिग्रहित.
- वर्ध्यात असणार 3 हजार 88 बेडचे नियोजन.