वर्धा - वैद्यकीय गर्भपात प्रकरणात आज पोलिसांनी डॉक्टर रेखा कदम आणि पती नीरज कदम यांच्या दवाखान्याच्या वरच्या माळावर झडती घेतली तेथे काही रजिस्टर तसेच वन्याप्राण्याची कातडी सुद्धा सापडल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. वन विभागाची चमू दाखल झाली असुन यासगळ्यांचा तपास करत आहे, या प्रकरणात सापडलेले कातडे तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपासानंतर ते नेमके कोणत्या प्राण्याचे आहे हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला आणखी वेगळी दिशा मिळणार आहे. वनविभाग आणि पोलिसांनी पंचनामा केला असून कदम यांच्या घराच्या झडतीत सापडलेल्या 10 फाईल आणि इतर कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आधीच गर्भपात प्रकरणात चर्चेत असलेल्या डॉ. कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
बायोगॅसमधून मिळाली 12 वी कवटी
वर्धेच्या कदम रुग्णालयातील ( Kadam Hospital Wardha ) अवैध गर्भपात प्रकरणात संताप ( Illegal Abortion Case Wardha ) व्यक्त होत आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या सहाय्याने शोधकार्य करत 12 कवटी जप्त केल्याची ( Skulls Found in Biogas ) माहिती आर्वी पोलिसांनी दिली आहे. यामुळे हे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अद्याप रुग्णालय सील करण्याची करवाई न झाल्याने पुरावे तर नष्ट होणार नाही ना, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेमध्ये रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या बायो गॅस प्लॅन्टमध्ये पोलिसांनी 12 कवट्या जप्त केल्या आहेत. पण यापूर्वी त्या गॅस प्लँटमध्ये काय काय नष्ट झाले याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे.
बायोगॅसमधून मिळाली बारावी कवटी -
बायोगॅस प्लँट मधून आतापर्यंत 12 कवट्या व 54 हाडे वापरलेले ग्लोज, सीरींज, प्लास्टिक मिळून आले होते. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांनी प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली. पोलिसांनी वर्धाचे आरोग्य पथक आणि नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने काही ठोस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेष पथकाची स्थापना -
या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासासाठी तीन अधिकाऱ्यांच्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यात पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर, एपीआय वंदना सोनवणे, पीएसआय जोत्सना गिरी, पोलीस कर्मचारी इम्रान खिलची, अतुल भोयर, गजानन लामटे, आणि महिला कर्मचारी विजया धोटे यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा बहुतांश तपास हा आरोग्य विभागाच्या अहवालावर आहे.
हितसंबंध असल्याने तपास निष्पक्ष होण्यास अडचण -
प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर रेखा कदम यांचे पती उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे. त्यामुळे या प्रकरणात कुठेतरी शासकीय रुग्णालय संबंधित असणारे अधिकारी निष्पक्ष चौकशी करू शकणार नाही, अशी शंका व्यक्त करत आहेत. डॉ. नीरज कदम यांच्याशी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील हितसंबंधांमुळे या प्रकरणाच्या तपासात अडचण निर्माण होऊ शकते. मागील दोन दिवसांपासून ती अडचण होत असलेल्या आरोग्य विभागाच्या कारवाईमुळे दिसूनही येत आहे. त्यामुळे या तपासात उपजिल्हा रुग्णालय बाहेरील किंवा गरज पडल्यास जिल्ह्याबाहेरील तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत चौकशी करावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष मेघराज डोंगरे यांनी पोलीस विभागाला दिलेल्या एका निवेदनातून केली आहे.