सोलापूर - सोलापुरात गेल्या अठरा तासांपासून पाऊस सुरू असल्याने ऑनलाईन व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. बुधवार व गुरुवारी होणारे ऑनलाईन व ऑफलाईन पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा नियंत्रक श्रेणीक शहा यांनी घेतला आहे.
बुधवारी सकाळपासून अतिवृष्टी सुरू झाल्यामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली होती. तसेच गेल्या पाच महिन्यापासून रखडलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा देखील सुरु आहेत. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 14 व 15 ऑक्टोबर 2020 या दोन दिवसांच्या परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे इंटरनेटचे नेटवर्क व खंडित वीजपुरवठा या कारणाने ऑनलाइन परीक्षा देताना नेटवर्कची अडचण विद्यार्थ्यांना आली. अनेक विद्यार्थी सकाळपासून लॉग इन करत होते. परंतु नेटवर्क आणि स्लो इंटरनेटमुळे विद्यार्थी हैराण झाले होते. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सुरू होणारे ऑनलाईन पेपर 12 वाजले तरी सुरू होत नव्हते. विद्यापीठाच्या हेल्पलाईन क्रमांकवर संपर्क केले असता 12 वाजता सुरू होईल असे उत्तरे दिली जात होती.
दुपारी 2 वाजता देखील ऑनलाईन पेपर सुरू झाले नाही. शेवटी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रण विभागाकडून अचानक नोटीस द्वारे कळविण्यात आले की, 14 व 15 ऑक्टोबर रोजी होणारे सर्व ऑनलाईन पेपर रद्द झाले असून या दोन दिवसांच्या परीक्षा अनुक्रमे दि. 19 व 20 ऑक्टोबर 2020 रोजी पूर्वनियोजित वेळेनुसार होतील. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
अतिवृष्टीचा फटका विद्यापीठाच्या ऑनलाईन परिक्षेवर -
सलग अठरा तास पाऊस झाल्यामुळे सोलापुरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीचा फटका विद्यापीठाच्या ऑनलाईन व्यवस्थेवर देखील झाला आहे. मंगळवारी सकाळ पासून अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी लॉग इन करत होते. परंतु नेटवर्क व इंटरनेटची वेग मर्यादा कमी असल्याने शेवटी विद्यापीठ प्रशासनाला 14 व 15 ऑक्टोबर रोजीची परीक्षा रद्द करावी लागली.